घरमुंबईवसुली भाय! पालांडे-शिंदेने बारमालक पोलीस बदल्यांसाठी पैसे घेतले

वसुली भाय! पालांडे-शिंदेने बारमालक पोलीस बदल्यांसाठी पैसे घेतले

Subscribe

सचिन वाझे होता मिडलमन कोर्टात ईडीकडून खुलासा

मुंबईतील बार मालकांकडून करण्यात आलेली कोट्यवधी रुपयांची वसुलीची रक्कम माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि पीए कुंदन शिंदे करत होते. सचिन वाझेने हे सारे आपल्या जबाबात सांगितल्याचा धक्कादायक खुलासा ईडीने शनिवारी न्यायालयात केला. शिंदे आणि पालांडेने या वसुलीच्या रकमा कुणाला दिल्या याची चौकशी करण्यासाठी मनी लाँडरिंगच्या गुन्ह्यात शुक्रवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली होती. शनिवारी ईडीने या दोघांच्या कोठडीची न्यायालयात मागणी केली आणि न्यायालयाने या दोघांना ७ दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांचे बिंग हळूहळू फुटत चालले आहे. शुक्रवारी ईडीने राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानावर छापेमारी करून त्यांची सात तास चौकशी केली. दरम्यान देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे आणि खासगी सचिव कुंदन शिंदे या दोघांना शुक्रवारी दुपारी चौकशीसाठी ताब्यात घेऊन रात्री उशिरा दोघांना मनी लाँडरिंगच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. दरम्यान शनिवारी या दोघांना पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले होते. ईडीने न्यायालयात केलेल्या खुलाशात संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांनी खात्यातील बदल्यांसाठी आणि मुंबईतील बीअर बार आणि ऑर्केस्ट्रा बार रात्री उशिरापर्यंत तसेच नियमबाह्यरित्या सुरू ठेवण्यासाठी कोट्यवधी रुपयांची वसुली केली. या रक्कम त्यांनी सचिन वाझेमार्फत घेतल्या असल्याचा खुलासा ईडीने न्यायालयात केला आहे.

- Advertisement -

ईडीने मुंबईतील बार मालकांच्या घेतलेल्या जबाबात त्यांनी देखील वाझेला पैसे दिल्याचे म्हटले आहे. तळोजा तुरुंगात असलेल्या वाझेचीही ईडीने तुरुंगातच २ तास चौकशी करून त्याचा जबाब नोंदवला आहे. त्याने गुन्ह्यांची कबुली देत हे पैसे कुंदन यांना दिल्याचे सांगितले. वाझे हा त्यावेळी मुंबई पोलीस दलातील सीआययू विभागाचा अधिकारी होता. वाझेने परिमंडळ १ ते ७ मधून जानेवारी व फेब्रुवारी दरम्यान १ कोटी ६४ लाख जमा करून घेतले. तर परिमंडळ ८ ते १२ मधून २ कोटी ६६ लाख जानेवारी फेब्रुवारी दरम्यान घेऊन दिले. ही वसुली बीअर बार रात्री १२ नंतर सुरू ठेवण्यासाठी व आर्केस्ट्रा बारमध्ये नियमापेक्षा जास्त नागरिकांना उपस्थित राहण्यास परवानगी मिळावी म्हणून करण्यात आली होती.

देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावे नागपुरात साई संस्था ट्रस्ट नावाची संस्था आहे. कुंदन हे देखील त्या संस्थेच्या संचालक मंडळावर आहेत. तसेच दिल्लीसह इतर ठिकाणच्या कंपनीवर ते मोठ्या पदावर आहेत. कुंदन देशमुखांच्या उपस्थितीत पैसे जमा करायचा, तर पालांडेने बदल्यांसंदर्भात पैसे जमा केले आहेत. या प्रकरणात सीबीआय भ्रष्टाचाराचा तपास करत असून ईडी पैशांचा व्यवहार कसा झाला आणि कुठे पैसे गुंतवण्यात आले याचा तपास करत आहेत.

- Advertisement -

ईडीमार्फत झालेल्या युक्तिवादात असे स्पष्ट करण्यात आले की, हे एका दोघाचे काम नाही. यात अन्य आरोपींचा सहभाग असल्याने या दोघांची ७ दिवस कोठडी मिळावी. या सुनावणीनंतर ईडीला पालांडे आणि कुंदन यांची ७ दिवसांची कस्टडी देण्यात आली आहे. येत्या १ जुलैपर्यंत ही कस्टडी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -