घरमुंबईसंस्कारी बाबूंवरही बलात्काराचा आरोप, लेखिकेची खळबळजनक पोस्ट

संस्कारी बाबूंवरही बलात्काराचा आरोप, लेखिकेची खळबळजनक पोस्ट

Subscribe

बॉलिवूडमध्ये सध्या सुरू असलेल्या #meetoo चळवळीमधून अनेक मोठमोठी नावं समोर येत असतानाच आता 'संस्कारी बाबू' म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते आलोक नाथ यांच्यावर देखील आता बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. मालिका लेखिका विंटा नंदा यांनी फेसबुक पोस्टमधून हा आरोप केला आहे.

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सध्या #meetoo ची नवी आवृत्ती पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी परदेशात सुरू झालेल्या या ऑनलाईन चळवळीमध्ये महिला आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचारांविषयी किंवा लैंगिक शोषणाविषयी बोलू लागल्या होत्या. त्यात भारतातीलही काही सेलिब्रिटिंनी आपला अनुभव व्यक्त केला होता. मध्ये काही दिवस यामध्ये खंड पडला होता. मात्र आता पुन्हा एकदा या चळवळीला सुरूवात झाली असून एकेकाळची बॉलिवुड अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावरच थेट विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा तनुश्रीने केल्यानंतर खळबळ माजली होती. त्यानंतर पूजा भट्ट, कंगना रनौत या अभिनेत्रींनीही आपलं लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न झाल्याचं सांगितल्याने आधीच खळबळ माजली असतानाच आता इंडस्ट्रीमध्ये ‘संस्कारी बाबू’ म्हणून ओळख असलेले अभिनेते आलोक नाथ यांच्यावरही आता लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आणि हा आरोप त्यांच्याच एकेकाळच्या गाजलेल्या सिरिअल ‘तारा’च्या लेखिकेने केला आहे.

लेखिका-दिग्दर्शिका आणि निर्माती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विंटा नंदा यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये हा खळबळजनक आरोप केला आहे. ‘तारा’ मालिका ९०च्या दशकामध्ये लोकप्रिय होती. याचदरम्यान आलोक नाथ यांनी आपलं लैंगिक शोषण केल्याचा आरोप विंटा नंदा यांनी केला आहे. या मालिकेमध्ये आलोक नाथ प्रमुख भूमिका साकारत होते, तर विंटा नंदा ही मालिका लिहीत होत्या. यासंदर्भात ८ ऑक्टोबरला रात्री विनीता नंदा यांनी एक सविस्तर फेसबुक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आलोक नाथ यांच्या नावाचा थेट उल्लेख केला नसला तरी ‘संस्कारी अभिनेता’ असा त्यांनी उल्लेख केला आहे. शिवाय आलोक नाथ यांनीही त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

‘त्याचा मालिकेच्या अभिनेत्रीवर डोळा होता’

या पोस्टमध्ये विंटा नंदा लिहितात की ‘तो दारूडा आणि निर्लज्ज होता. मालिकेच्या नायिकेला तो त्रास द्यायचा. पण त्याला कुणीही बोलत नव्हतं. शेवटी आम्ही जेव्हा त्याला काढून टाकण्याचा निर्णय घेतला तेव्हा तो सेटवर दारू पिऊन आला. आणि त्यानं नायिकेच्या अंगलट जायला सुरूवात केली. नायिकेनं त्याला थोबाडीत लावली. त्या घटनेपासून आमच्यातली मैत्री संपली होती. पण आमच्या कॉमन मित्रांनी आमच्यात पुन्हा समेट घडवून आणला.’

- Advertisement -

…आणि मालिका बंद पडली

आलोक नाथ गेल्यानंतर मालिका बंद पडली आणि आपलं कामही गेल्याचं विंटा नंदांनी या पोस्टमध्ये लिहिलंय. त्या म्हणतात ‘त्या घटनेनंतर त्याला (आलोक नाथ) आम्ही काढून टाकलं. पण मालिकेचा टीआरपी घसरायला लागला. मॅनेजमेंटने स्टोरीमध्ये बदल करून त्याला पुन्हा मालिकेत आणलं. पण टीआरपी वाढला नाही. त्यामुळे अखेर ‘तारा’ बंद करायला लागली. माझा जॉब गेला.’

‘त्या’ पार्टीतच अघटित घडलं

विंटा नंदा यांनी या सविस्तर फेसबुक पोस्टमध्ये ‘त्या’ प्रसंगाविषयीही लिहिले आहे. त्यांच्या पोस्टनुसार आलोक नाथ यांनी एक दिवस त्यांच्या घरी पार्टी ठेवली होती. याआधीही अनेकदा मित्रांसोबत अशा प्रकारे पार्टी केल्यामुळे विंटा नंदाही तिथे गेल्या. पण त्यांच्या ड्रिंकमध्ये काहीतरी मिसळल्यासारखं त्यांना वाटलं. ड्रिंक घेतल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटायला लागलं. रात्री २ वाजता जेव्हा त्या घरी जायला निघाल्या, तेव्हा त्यांना कुणीही सोडायला आलं नाही. अखेर त्या एकट्याच चालत घराकडे निघाल्या. पण तेव्हाच आलोक नाथ गाडी घेऊन तिथे आले आणि ‘घरी सोडतो’ असं सांगत विंटा यांना गाडीत बसवलं. पण तेव्हाच त्यांची शुद्ध हरपली. पुढे फक्त त्यांना जबरदस्तीने दारू पाजली जात असल्याचं आठवत होतं.

‘सकाळी मला खूप त्रास होत होता’

पोस्टमध्ये विंटा लिहितात, ‘दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी उठले तेव्हा मला खूप दुखत होतं. माझ्यावर फक्त बलात्कारच झाला नव्हता तर मला माझ्याच घरात मारहाण देखील करण्यात आली होती. मी घडलेला प्रकार माझ्या काही मित्रमंडळींना सांगितला. पण त्यांनी उलट मला सर्वकाही विसरून जायचाच सल्ला दिला.’

‘म्हणून इतक्या उशीरा बोलतेय’

दरम्यान, ९०च्या दशकात घडलेल्या या प्रकाराबद्दल इतक्या वर्षांनंतर का बोलत आहे यावरही विंटा नंदा यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे. ‘त्या प्रकारानंतर मी मोडून गेले होते. दारू पिऊ लागले होते. ड्रग्जच्याही आहारी गेले होते. मला त्या धक्क्यातून सावरायला मित्रमंडळींनी खूप मदत केली. २००९पासून मी या धक्क्यातून हळूहळू सावरू लागले. आता त्या घटनेच्या जवळ जवळ २० वर्षांनंतर आता माझं आयुष्य पूर्वपदावर आलं आहे.’

‘काळानुसार खरं काय ते बाहेर येईलच!’

यासंदर्भात आलोक नाथ यांनी एबीपी माझाला प्रतिक्रियाही दिली आहे. मात्र, आरोप फेटाळण्याऐवजी त्यांनी वैतागून प्रतिक्रिया दिली आहे. ‘तुम्ही त्याबद्दल त्यांनाच विचारा. आपण फक्त महिलांचीच बाजू ऐकून घेतो. कारण त्यांना कमजोर मानलं जातं. महिलांनी सांगितलेलंच खरं मानलं जातं. मग ती म्हणतेय तेच खरं असेल. माझ्या बोलण्यावर कोण विश्वास ठेवणार? माझ्यावर तर आरोप लागले आहेत. पण काळानुसार खरं काय ते बाहेर येईलच’ अशा प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -