घरCORONA UPDATEगोरेगावमध्ये १२४० खाटांचे महापालिकेचे तंबू रुग्णालय!

गोरेगावमध्ये १२४० खाटांचे महापालिकेचे तंबू रुग्णालय!

Subscribe

मुंबईतील सर्व निवडणुकींच्या मतपेट्या ठेवण्यात येणाऱ्या तसेच मतदानाची मोजणी पार पडणाऱ्या शिवाय विविध कॉर्पोरेट कंपन्यांचे प्रदर्शन भरवल्या जाणाऱ्या गोरेगाव येथील राष्ट्रीय प्रदर्शन केंद्रात अर्थात नेस्कोच्या जागेत आता कोरोनाग्रस्तांवर उपचार केले जाणार आहे. या ठिकाणच्या प्रशस्त जागेवर तात्पुरते तब्बल १२४० खाटांचे तंबूमधील रुग्णालय उभारण्यात येत आहे. या ठिकाणी सर्व प्रकारच्या सेवा सुविधा तसेच रुग्ण खाटांसह डॉक्टर आणि नर्सेस, तसेच वॉर्डबॉय आदींची व्यवस्था करण्यात आली. चीनमध्ये अशाप्रकारे तात्पुरते तंबू बांधून रुग्ण सेवा पुरवली गेली असून त्याच धर्तीवर मुंबईतील हे पहिले तंबू रुग्णालय गोरेगावमध्ये उभारले जात आहे.

कोरोना रुग्णांवर उपचार करता यावेत, तसेच कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाईनमध्ये ठेवता यावे यासाठी महापालिकेच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. कस्तुरबा, सेव्हन हिल्ससह काही उपनगरीय रुग्णालयांमध्ये कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आयसोलेन कक्ष बनवण्यात आले असले तरी भविष्यात ही संख्या अपुरी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोरेगाव पूर्व येथील द्रुतगती मार्गाला जोडून असणाऱ्या राष्ट्रीय प्रदर्शन केंद्रात १२४० खाटांची, प्राणवायूच्या सुविधेसह पर्यायी यंत्रणा उभी केली जात आहे. येथील प्रत्येक खाटांना प्राणवायू अर्थात ऑक्सिजनची यंत्रणा आहे. आतापर्यंत ३०० खाटांचे कक्ष उभारणीचे काम पूर्ण झाले असून उर्वरित खाटांची व्यवस्था मे महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या आधी करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.

- Advertisement -

या प्रदर्शन केंद्रातील १२४० खाटांचे तात्पुरते रुग्णालय उभारण्याच्या कामासाठी निवृत्त उपायुक्त देवेंद्र जैन यांची मदत घेतली जात आहे. त्यांची या कामासाठी निवड करण्यात आली आहे. महापालिका उपायुक्त आनंद वाघ्राळकर आणि पी-दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त देविदास क्षिरसागर यांच्या देखरेखीखाली सुरु असलेल्या या तंबूतील रुग्णालयाच्या तयारीची पाहणी महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी रविवारी केली. यावेळी हे रुग्णालय ५ मेपर्यंत सुरु होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

याठिकाणी ५ प्रचंड हॉल आहेत. ज्यामध्ये सुसज्ज अशी सुमारे २०० शौचालये आहे. याशिवाय सर्व प्रकारच्या मंडप उभारणीचे काम करून त्यामध्ये वातानुकूलित यंत्रणांसह विद्युत जोडणी आणि इतर प्रकारच्या सुविधाही उपलब्ध करून दिल्या जात आहेत. यामध्ये दहा बाय दहा फुटांच्या जागेत एक खाट अशा प्रकारे खाटांची रचना केली आहे. त्याबरोबरच दैनंदिन स्वच्छता, सॅनिटायझेशन, कॅटरर्स, कंट्रोल रुम, डॉक्टर, नर्सेस रुम आदींचीही विशेष व्यवस्था याठिकाणी करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -