घरमुंबईअबब...एसटी महामंडळाचा फेसबुक पासवर्ड हरवलाय

अबब…एसटी महामंडळाचा फेसबुक पासवर्ड हरवलाय

Subscribe

सोशल मीडियाबाबत प्रशासन उदासीनच

एकीकडे सार्वजनिक वाहतूक विभाग प्रवाशांच्या उत्तम सेवेसाठी सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात करताना दिसून येत आहे. तर दुसरीकडे राज्यभरात सर्वांत मोठे जाळे असलेले एसटी महामंडळ मात्र,टेक्नॉलॉजीच्या बाबतीत मागे असल्याचे दिसून येत आहे. कारण एसटीएसटी महामंडळ आपल्या फेसबुक पेजचा पासवर्डचा विसरला आहे. त्यामुळे तब्बल पाच वर्षे एसटी महामंडळाचे अधिकृत फेसबुक पेज कार्यरत नसल्याचे समोर आले आहे.

महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन – एमएसआरटीसी या नावाने एसटी महामंडळाने 27 ऑगस्ट 2013 अर्थात सात वर्षांपूर्वी प्रवाशांच्या सोयीसाठी फेसबुक पेज सुरू केले होते. राज्यभरात एसटीचा वाढता पसारा पाहता या पेजवर लाईक्स आणि फॉलोअर्सचा भडीमार सुरू झाला. या पेजला तब्बल 19 हजार 543 फेसबुक युजर्सने लाईक केले, तर 19 हजार 649 युजर्सनी फॉलो केले होते.

- Advertisement -

महामंडळाच्या विविध उपक्रमांसह वेगवेगळ्या भागांत सोडण्यात येणार्‍या जादा गाड्यांची माहिती या पेजच्या माध्यमातून हजारो प्रवाशांपर्यंत पोहचत होती. सुरूवातीच्या काळात प्रवाशांच्या समस्यांनाही या पेजवर प्रतिसाद मिळत होता. मात्र कालांतराने पेजवरील पोस्टच बंद झाल्याची धक्कादायक बाब समोर आली.

पेज पाहणारा अधिकारीच बडतर्फ
हे पेज चालविणार्‍या अधिकार्‍याला कामावरून काढून टाकण्यात आले होते. हा अधिकारी एसटीतून गेल्यानंतर या पेजची दखल कोणीच घेतली नाही. या पेजवर शेवटची पोस्ट 31 ऑक्टोबर 2015 रोजी पोस्ट केल्याचे निदर्शनास येते. मात्र जेव्हा हे फेसबूक पेज सुरु करण्याचा प्रयत्न एसटी महामंडळाने केला, तेव्हा पासवर्ड चुकीचा असल्याची माहिती समोर आली आहे. यासंबंधीत एसटी अधिकार्‍यांना विचारणा केली असता, अधिकारी वर्गाकडून उडवाउडवीची उत्तर देण्यात आली. अशा परिस्थितीत नवनिर्वाचित परिवहन मंत्री व महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब या प्रकरणाची दखल घेणार का? आणि वाहतूक विभागाला यापुढे तरी जाग येणार का? असा प्रश्न प्रवाशांमधून उपस्थित केला जात आहे.

- Advertisement -

एसटी महामंडळाला केव्हा येणार जाग?
एसटीचा सुमारे 90 टक्के कारभार हा महामंडळाच्या वाहतूक विभागामार्फत हाकला जातो. प्रवाशांसाठी चालवण्यात येणार्‍या फेर्‍यांचे नियोजन आणि त्यांच्या तक्रारीची नोंद वाहतूक विभाग घेत असते. परिणामी, संबंधित पेजची जबाबदारी ही वाहतूक विभागाकडेच असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली. मात्र सुस्तावलेल्या वाहतूक विभागाकडून या पेजकडे दुर्लक्ष होत असल्याने एसटी प्रवाशांना हक्काच्या व्यासपीठापासून वंचित राहावे लागत आहे.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -