घरमुंबईशहापुरात उपप्रादेशिक विभागाने केली 1 कोटी 37 लाखांची भात खरेदी 

शहापुरात उपप्रादेशिक विभागाने केली 1 कोटी 37 लाखांची भात खरेदी 

Subscribe
महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या उपप्रादेशिक विभागाने सुरू केलेल्या भात खरेदी केंद्रात एकूण 1 कोटी 37 लाख 30 हजार 535 रुपयांची अशी विक्रमी भात खरेदी यंदा झाल्याची माहिती शहापूर उपप्रादेशिक विभागाने दिली.
शहापूर उपप्रादेशिक विभागाच्या कार्यक्षेत्रातील ठाणे व रायगड जिल्ह्यातील चार तालुक्यातील शेतकर्‍यांकडून भाताची हमीदराने खरेदी करण्यात आली. यात शहापूर, मुरबाड, भिवंडी  व कर्जत तालुक्यांचा समावेश आहे. उपप्रादेशिक विभागाने एकूण 11 भात खरेदी केंद्रांना मंजुरी दिली आहे. यापैकी 9 भात खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या भात खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणावर शेतकर्‍यांकडून सध्या भात खरेदी सुरू आहे. अशी माहिती शहापूर उपप्रादेशिक व्यवस्थापक विनय  येडगे यांनी दिली.
शासनाने सर्वसाधारण भाताला 1 हजार 750 रुपये प्रतिक्विंटल भाव देण्यात आला आहे, तर ‘अ’ दर्जा असलेल्या भाताला 1 हजार 770 रुपये प्रतिक्विंटल  असा भाव शेतकर्‍यांना देऊन ही भातखरेदी शेतकर्‍यांकडून  केली जात आहे. यात आणखी 200 रुपये शेतकर्‍यांना अधिक बोनस म्हणून दिले जाणार आहेत. आतापर्यंत भात खरेदी केंद्रावर 315 शेतकर्‍यांचा भात खरेदी करण्यात आला आहे. यात एकूण 65 हजार क्विंटल भात खरेदी करण्यात आला. खरेदी करण्यात आलेला हा सर्व भात लवकरच भरडाई करून शासनास जमा केला जाणार आहे. भात खरेदीसाठी शेतकर्‍यांना आता चांगला हमी दर दिला जात असल्याने शेतकर्‍यांनी खाजगी व्यापार्‍यांकडे आपला भात कवडीमोल भावाने विक्री न करता तो सर्व भात महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या शहापूर उपप्रादेशिक विभागाच्या भात खरेदी केंद्रावरच भाताची विक्री करावी, असे आवाहन उपप्रादेशिक व्यवस्थापक विनय येडगे यांनी शेतकर्‍यांना केले आहे, तसेच लवकरच अन्य ठिकाणीही उर्वरित भात खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे उपप्रादेशिक व्यवस्थापक विनय येडगे यांनी दैनिक ‘आपलं महानगर’ला माहिती देताना सांगितले.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -