घरमुंबई‘सुपर फायर वुमन’ सुनीता पाटील

‘सुपर फायर वुमन’ सुनीता पाटील

Subscribe

पुरुषांच्या मक्तेदारीला आव्हान

सर्व बाजूंनी वेगाने वाढत जाणार्‍या मुंबईला सतत आगीच्या घटनांना सामोरे जावे लागते. यामुळे मुंबईच्या अग्निशमन दलावरचा ताण आणि आव्हाने प्रचंड वाढली आहेत. या परिस्थितीत आगीशी सामना करणे ही एक कसोटी ठरते. ही कसोटी पार पाडण्यासाठी तुम्ही शारीरिक आणि मानसिकरीत्या कमजोर असून चालणार नाही. या आधी केवळ पुरूष या क्षेत्रात उत्तमरीत्या कामगिरी बजावू शकतात असा समज होता. मात्र 2012 मध्ये हम भी किसीसे कम नही, म्हणत महिलांनी या क्षेत्रात प्रवेश केला आणि ‘सुपर फायर वुमन’ म्हणत आपल्या जीवावर उदार होऊन काम करायला सज्ज झाल्या.

2012 साली 7 महिलांपासून ‘सुपर फायर वुमन’च्या युनिटची सुरुवात झाली. ही संख्या वाढून अग्निशमन दलात सध्या 117 महिला कार्यरत आहेत. या सुपर फायर वुमनच्या अधिकारी सुनीता पाटील यांनी ‘आपलं महानगर’ला महिला दिनानिमित्त काही अनुभव सांगितले आहेत. हे अनुभव सांगताना त्यांच्या चेहर्‍यावर अग्निशमन दलाविषयी वाटणारा अभिमान स्पष्ट दिसत होता.

- Advertisement -

सुनीता पाटील म्हणाल्या, अग्निशमन दलात येणे हे काही माझे स्वप्न नव्हते. बाय चॉईस नाही तर बाय चान्स मी इथे आले. जेवण झाल्यावर शतपावली करायला मी घरातून बाहेर पडले आणि माझ्या हातात भरतीच्या जाहिरातीचा पेपर पडला. ही जाहिरात वाचून लग्नानंतर 16 वर्षांनी पुन्हा एकदा नोकरी करण्याचा निर्णय मी घेतला. हे क्षेत्र खूप वेगळं आहे. या क्षेत्राने आम्हाला खरचं काहीतरी वेगळं करून दाखवायची संधी दिली. 2011 मध्ये आमची परीक्षा झाली, खडतर प्रशिक्षण झालं आणि 2012 मध्ये आम्ही सात महिला पहिल्यांदा मुंबईच्या अग्निशमन दलात रूजू झालो. सुरूवातीला प्रशिक्षण सुरू असताना आम्ही खरंच योग्य क्षेत्रात आलो आहोत ना? हे सगळं आपल्याला जमेल ना? असे विचार सतत मनात यायचे. पण इथे रूजू झाल्यावर स्वत:ला सिध्द करण्यासाठी हीच खरी संधी आहे हे समजलं आणि जोमाने कामाला सुरूवात केली.

या कामामुळे अनेक व्यक्तींचे प्राण आज वाचवू शकले आहे. आजपर्यंत कॉल अटेंड केले. कधी भीती वाटली तर कधी लोकांचे प्राण वाचवल्याचं समाधान मिळालं. अलीकडेच ख्रिस्टल टॉवरला आग लागली होती. आग वाढतच गेली आजूबाजूला एवढी गर्दी जमली होती की त्यातून मार्ग काढत जाणं कठीण होतं. आम्ही आमच्या शिडीचा आधार घेत कसेतरी वर चढलो पण वरती गेल्यावरर 13 जणांचे प्राण माझ्यामुळे वाचले यांचे समाधान मिळालं. आमचं प्रशिक्षण इतक्या चांगल्या पध्दतीने होतं की कोणत्याच घटनेची,समस्येची भीती वाटत नाही. अनेकदा सार्वजनिक मोर्चावेळी अनेक गाड्या एकावेळी अडवण्याचं काम मी एकटीने केले आहे. यावेळी पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून आपणही काम करतोय याचा आनंदच वेगळा असतो. सुरूवातीला पुरूषांच्या अंगावरील केवळ युनिफॉर्म बघून आलेली मी आज अग्निशमन दलातील महत्त्वाचा भाग बनले आहे.

- Advertisement -

मी या क्षेत्रात येताना माझ्यासमोर कोणा अग्निशमन दलातील महिलेचा आदर्श नव्हता. पण आज नव्याने या क्षेत्रात येऊ पाहणार्‍या महिलांसाठी मी आदर्श बनले आहे. याचे जास्त समाधान आहे. जागतिक महिला दिन हा केवळ एक दिवस नाही. अग्निशमन दलात काम करणार्‍या महिलेसाठी रोजच महिला दिन असतो. कारण नेहमीच तुम्हाला सिध्द होण्याची, लोकांचे प्राण वाचवण्याची संधी मिळत असते. या क्षेत्रात येताना घरच्यांचा पाठिंबा खूप महत्त्वाचा असतो. इथे तीन शिफ्ट्समध्ये काम करावं लागतं. त्यामुळे मानसिक, शारीरिकदृष्ठ्या सक्षम असाल तरच या क्षेत्रात या, असे आवाहन सुनीता पाटील यांनी यावेळी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -