घरमुंबईकेमिकल फेकणारा नराधम गजाआड

केमिकल फेकणारा नराधम गजाआड

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून पश्चिम रेल्वे मार्गावरील अंधेरी रेल्वे स्थानकात महिलांवर रासायनिक पदार्थाने हल्ला करणार्‍या नराधमाने दहशत निर्माण केली होती. तब्बल दीड महिन्यानंतर या नराधमाला अंधेरी रेल्वे पोलिसांनी सापळा रचून पकडले असून, त्याच्यावर एकाच स्वरूपाचे पाच गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. रामवीर रामरुप चौधरी (२४) असे या नराधमाचे नाव आहे.

अंधेरी (प.), महालक्ष्मी सोसायटीमध्ये राहणार्‍या गायत्री अंधन शुक्रवारी सकाळी अंधेरी स्टेशनवर आल्या होत्या. गर्दीतून चालत असतानाच त्यांच्या मागून चालणार्‍या एका नराधमाने त्यांच्यावर फेविक्विक फेकले. अंगावर तो पदार्थ पडताच त्यांनी मागे वळून पाहिले असता एक तरुण हातात फेविक्विकची बाटली घेऊन उभा असल्याचे निदर्शनास आले. गायत्री अंधन यांनी लगेच आरडाओरडा केला. त्याला पकडण्यासाठी सापळा रचून उभे असलेल्या निर्भया पथकातील महिलांनी त्याच्यावर झडप घातली आणि त्याला पकडून ठेवले. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी त्याला अटक केली.

- Advertisement -

गुरुवारीही सकाळच्या सुमारास एक महिला अंधेरी स्थानकातून जात असताना याच आरोपीने अशाच प्रकारचा हल्ला केला होता. याआधीही असे प्रकार घडल्याने पोलिसांनी सीसीटिव्हीच्या मदतीने आरोपीचा शोेध घेण्याचा प्रयत्न केला होता. सीसीटिव्ही फुटेजमध्ये एक तरुण संशयास्पद हालचाली करत असल्याने पोलिसांनी त्याला संशयित म्हणून हेरले होते. दररोज सकाळी ९ ते १० च्या दरम्यान हे प्रकार घडत असल्याने अंधेरी लोहमार्ग रेल्वे पोलीस आणि निर्भया पथकाने मेट्रोकडे जाणार्‍या रस्त्यापासून रेल्वे स्थानकातील पुलावर सापळा रचला होता. सकाळच्या सुमारास पोलिसांनी वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे आरोपी मेट्रो स्थानकाकडून पुलाकडे जात होता त्यावेळी त्याने एका महिलेवर हा पदार्थ फेकला आणि पोलिसांनी त्याला रंगेहाथ अटक केली.

आरोपी फर्निचरच्या दुकानात काम करतो
आरोपी रामवीर रामरुप चौधरी उर्फ वर्मा हा लोअर परळमधील एका फर्निचरच्या दुकानात काम करत असे. फर्निचर चिकटवण्यासाठी वापरण्यात येणारे फेविक्विक ज्वलनशील असल्याचे त्याला माहीत होते. म्हणून केवळ मजेखातर म्हणून तो हे पदार्थ एका इंजेक्शनच्या साहाय्याने महिलांवर फेकत होता, असे अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -