घरमनोरंजनभारतीय चित्रपट सृष्टीतील पहिल्या 'आयटम गर्ल'ची शोकांतिका !

भारतीय चित्रपट सृष्टीतील पहिल्या ‘आयटम गर्ल’ची शोकांतिका !

Subscribe



आयटम गर्ल म्हटल्यावर आपल्या नजरेसमोर पटकन येतात त्या आजच्या जमान्यातल्या मलायका अरोरा, नोरा फतेही, सनी लिओनी किंवा सामंथा प्रभु या मदनिकांच्या मादक अदा !… पण आयटम गर्लची ही परंपरा खूप जुनी आहे. चाळीस-पन्नासच्या दशकात सुरु झालेल्या या परंपरेतली पहिली आयटम गर्ल होती एक अँग्लो इंडियन तरुणी, जिचं नाव होतं कुक्कू मोरे.
चाळीस आणि पन्नासच्या दशकातील अनोखी अदा, अंदाज, आवरा, यहुदी, चोर बाजार, शायर, बरसात, पारस, आरजू, परदेस, आन अशा कैक चित्रपटांतील गाण्यात कुक्कूचे पाय थिरकले आहेत. या चित्रपटांतील नायक नायिकांना संपूर्ण चित्रपटातील भूमिकेसाठी जेवढं मानधन मिळायचं त्यापेक्षा कैक पटीने जास्त मानधन कुक्कूला चित्रपटातील तिच्या फक्त एका आयटम सॉंगसाठी मिळायचं. असं म्हटलं जातं की, एका गाण्यासाठी कुक्कू ६००० रुपये एवढी रक्कम घेत असे. तिच्या नृत्यातील तिच्या लवचिक अदांमुळे तिला ‘रबर गर्ल’ म्हटलं जायचं.
नितीन बोस यांच्या ‘मुजरीम’ चित्रपटात तिनं पहिलं आयटम सॉंग केलं. त्यांनतर तिला मिळालेल नानूभाई वकिलांचा ‘अरब का सितारा’ हा चित्रपट तिच्यासाठी मैलाचा दगड ठरला. म्हणता म्हणता कुक्कुनं चित्रपटसृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण केलं. त्यावेळच्या भल्या भल्या निर्मात्यांच्या रांगा तिच्या दारात लागू लागल्या. चांगल्या बॅनरच्या चित्रपटांतील एका गाण्यासाठी का होइना पण कुक्कूची हजेरी जरूर लागायची. तिच्या नृत्यात एक खासियत होती, त्यात मनमोहक अदा होत्या पण अश्लीलता नव्हती. नृत्य तिच्यात उपजत होतं, त्याचं तिनं कुठलंही शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलं नव्हतं. तिने स्वतःचीच वेगळी नृत्यशैली विकसित केली होती. ज्या कॅब्रे डान्सला हिंदी चित्रपटांमध्ये ख्याती मिळाली त्यात कुक्कू मोरेंचं मोठं योगदान होतं. आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे हेलनला चित्रपटसृष्टीत आणण्यात कुक्कूचा मोठा हात होता. तसंच हिंदी चित्रपटांतील प्राण समजला जाणाऱ्या प्राण साहेबांनाही जास्तीत जास्त चित्रपट मिळवून देण्याचं श्रेय कुक्कूला जातं.
तिने अंगभूत कलेच्या जोरावर खोऱ्यानं पैसे कमवले. असं म्हटलं जातं की, तिच्याकडे तीन गाड्या होत्या. त्यातील एक स्वतःसाठी, दुसरी खास मित्रांसाठी आणि तिसरी गाडी तिने पाळलेल्या वेगवेगळ्या जातीच्या महागड्या कुत्र्यांना फिरवण्यासाठी वापरली जायची. मुंबईतील उचभ्रु परिसरात कुक्कूच्या मालकीची घरं होती. साठचं दशक येता येता हिंदी सिनेमा बदलांच्या वेगवेगळ्या आवर्तनांतून जात असतानाच, कुक्कूला उतरती कळा लागली. कधी कुठल्या निर्मात्यासोबत तर कधी कुठल्या कोरिओग्राफरसोबत कुक्कूचं नाव जोडलं जाऊ लागलं. कुक्कू गॉसिपिंगची शिकार झाली. त्यातच कुक्कूच्या जीवनात तिने केलेली सर्वात मोठी चूक म्हणजे तिने येणारे पैसे मित्रमंडळीवर बेदरकारपणे उडवले. तिची सारी मालमत्ता सरकारने टॅक्स चोरीच्या घोटाळ्यात जप्त केली.
कुक्कूचे दिवस फिरले आणि कधी काळी फाईव्ह स्टार हॉटेल मधून जेवण मागवणाऱ्या कुक्कूकडे वाणसामान आणून जेवण बनवायलाही पैसे उरले नाहीत. भाजी मार्केटमध्ये टाकलेल्या भाज्या गोळा करून ती त्यावर गुजराण करत होती. शेवटच्या दिवसांत कुक्कूला कर्करोग झाला होता. त्यातच भारतीय चित्रपट सृष्टीच्या या पहिल्या आयटम गर्लनं १९८१ साली जगाचा अखेरचा निरोप घेतला. दैवदुर्विलास हा की, त्यावेळी चित्रपटसृष्टीतील कुणीही तिच्याकडे फिरकलं नाही.







- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -