घरमुंबईदुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक

दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक

Subscribe

एका आरोपींविरुद्ध दुचाकी चोरीच्या 33 हून गुन्ह्यांची नोंद

दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना दोन वेगवेगळ्या घटनेत वर्सोवा आणि ओशिवरा पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. सुनिल अनिल राठोड, सिद्धेश ऊर्फ सिधू विजय सिंग आणि अजानअली खान ऊर्फ अभयराज मोतीलाल सरोज ऊर्फ मोनू अशी या तिघांची नावे आहेत. यातील मोनू हा वाहनचोरीचा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध 33 हून अधिक दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

अ‍ॅक्टिव्हा पळवली
अनिल सदाले या तरुणाने जून महिन्यात बरिस्ता हॉटेलजवळून त्याची अ‍ॅक्टिव्हा बाईक चोरीस गेल्याची तक्रार वर्सोवा पोलीस ठाण्यात केली होती. काही कामानिमित्त अंधेरी येथे आल्यानंतर अनिलने ही बाईक जे. पी रोडवरील बरिस्ता हॉटेलजवळ पार्क केली होती. मात्र काही वेळाने तो तिथे आल्यानंतर ती बाईक तिथे नव्हती, याप्रकरणी बाईक चोरीचा गुन्हा नोंद होताच वर्सोवा पोलीस पळून गेलेल्या बाईकचोरांचा शोध घेत होते. ही शोधमोहीम सुरु असतानाच शुक्रवारी अंधेरीतील यारीरोड-वर्सोवा परिसरातील हिंदू स्मशानभूमीजवळ सुनिल राठोड आणि सिद्धेश सिंग या दोघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले.

- Advertisement -

चोरीची कबुली
चौकशीत त्यांनीच ही बाईक चोरी केल्याची कबुली दिली होती. त्यानंतर या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. दुसर्‍या घटनेत ओशिवरा पोलिसांनी अजानअली ऊर्फ मोनू याला बाईक चोरीच्या गुन्ह्यात अटक केली. जोगेश्वरी येथे राहणार्‍या एका सुरक्षारक्षकाने मार्च महिन्यात ओशिवरा पोलिसांत त्याची होंडा शाईन ही बाईक घराजवळ पार्क केली असता चोरी झाल्याची तक्रार केली होती. अशफाक रसुल भालदार हे जोगेश्वरी परिसरात राहत असून ते सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. 15 मार्च ते 31 मार्चला ते त्यांच्या सोलापूर येथील गावी गेले होते, यावेळी ही बाईक चोरट्यांनी पळविली होती. याच गुन्ह्यात मालाड पोलिसांनी मोनू या सराईत गुन्हेगाराला अटक केली.

३२ गुन्ह्यांची नोंद
चौकशीत त्यानेच ही बाईक चोरी केल्याचे उघडकीस येताच त्याचा ओशिवरा पोलिसांनी तळोजा कारागृहातून ताबा घेतला होता. मोनूविरुद्ध बाईक चोरीचे 33 हून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. त्यात सर्वाधिक खार येथे तेरा, बांगुरनगर, बोरिवली येथे प्रत्येकी दोन, वाकोला चार, मालाड, वांद्रे, आंबोली, जोगेश्वरी, एमआयडीसी, निर्मलनगर, खेरवाडी, मालवणी, सांताक्रुज पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक बाईक चोरीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. बाईक चोरीच्या गुन्ह्यांत तिन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. त्यांच्या अटकेने अशाच बाईक चोरीच्या अन्य काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -