घरमुंबईगाफील विद्यापीठ, लाखमोलाच्या दुर्मिळ ट्रॉफींची चोरी

गाफील विद्यापीठ, लाखमोलाच्या दुर्मिळ ट्रॉफींची चोरी

Subscribe

तीस ते चाळीस वर्षे जुन्या, चांदीच्या ट्रॉफींसह शेकडो ट्रॉफी कलिना कॅम्पसमधील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समधून रविवारी चोरीला गेल्या.

आंतर विद्यापीठ, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत विद्यार्थ्यांनी पटकावलेल्या व मुंबई विद्यापीठासाठी अभिमानास्पद असलेल्या ट्रॉफी प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे चोरीला गेल्या आहेत. तीस ते चाळीस वर्षे जुन्या, चांदीच्या ट्रॉफींसह शेकडो ट्रॉफी कलिना कॅम्पसमधील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समधून रविवारी चोरीला गेल्या. विशेष म्हणजे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सपासून मुंबई विद्यापीठाच्या सुरक्षारक्षकांचे कार्यालय हाकेच्या अंतरावर आहे. असे असतानाही विद्यापीठाचे गौरव चौरीला गेल्याने विद्यापीठातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा उद्भवला आहे.

चाळीस वर्षांपासून विद्यार्थ्यांनी विविध स्तरावर गौरवास्पद कामगिरी करत मुंबई विद्यापीठाचे नाव उज्ज्वल केले आहे. विद्यार्थ्यांनी अथक मेहनत घेऊन विविध खेळांमध्ये कमावलेल्या ट्रॉफी कलिना कॅम्पसमधील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, विद्यापीठाच्या गलथान कारभारामुळे या गौरवशाली इतिहासावर चोरांनी डल्ला मारला. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये ट्रॉफीने भरलेले एक संपूर्ण कपाटच चोरांनी रविवारी रात्री लंपास केले आहे. या कपाटामध्ये चांदीसह काही दुर्मिळ ट्रॉफी व अनेक छोट्या-मोठ्या ट्रॉफी ठेवल्या होत्या. या चोरीमुळे मुंबई विद्यापीठाची प्रतिष्ठा धुळीस मिळाली आहे. मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस येथील सुरक्षारक्षकांचे कार्यालय हे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्येच आहे. ट्रॉफींचे कपाट चोरी झाले त्या ठिकाणाहून हे कार्यालय हाकेच्या अंतरावर आहे. तसेच चोरी झालेल्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सीसीटीव्ही लावले नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. लॉकडाऊनमुळे सध्या विद्यापीठात पुरेसे मनुष्यबळ नसल्याचा फायदा घेत चोरांनी डाव साधला असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये यापूर्वी विद्यार्थींवर अत्याचाराच्या घटना घडल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि पोलीस चौकी उभारण्याची मागणी युवासेनेच्या सिनेट सदस्य डॉ. सुप्रिया करंडे तीन वर्षांपासून करत आहेत. मात्र सीसीटीव्ही लावण्यास विद्यापीठाकडून वारंवार टाळाटाळ करण्यात येत आहे. बीकेसी पोलिसांकडून कॅम्पसमध्ये पोलीस चौकी उभारण्यासंदर्भात विद्यापीठाला पत्रही दिले आहे. मात्र, त्याकडेही विद्यापीठाकडून दुर्लक्ष केल्याचा आरोप सुप्रिया करंडे यांनी केला.

बुडीत बँकेत पैसे ठेवण्यासाठी कोट्यवधी रुपये आहेत. परंतु गौरवशाली इतिहासाच्या सुरक्षेवर खर्च करण्यासाठी विद्यापीठ टाळाटाळ करते. ही बाब विद्यापीठासाठी लांच्छनास्पद आहे. सुरक्षारक्षक कार्यालयापासून हाकेच्या अंतरावरून ट्रॉफी चोरीला जाणे खेदजनक आहे. रविवारी घटना घडूनही अद्यापही याबाबत विद्यापीठाने काहीच हालचाल केलेली नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.
– डॉ. सुप्रिया करंडे, मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य, युवा सेना

 

ट्रॉफीच्या चोरीसंदर्भात मी स्पोर्ट्स विभागाच्या प्रमुखांकडून माहिती घेतो. त्यानंतर ट्रॉफी प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात येतील.
– विनोद पाटील, प्रभारी रजिस्टार, मुंबई विद्यापीठ
Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -