घरCORONA UPDATEमुंबई मनपाचे नवे आयुक्त इक्बाल सिंह चहल कोरोनावर नियंत्रण मिळवतील?

मुंबई मनपाचे नवे आयुक्त इक्बाल सिंह चहल कोरोनावर नियंत्रण मिळवतील?

Subscribe

महाराष्ट्रातील वरिष्ठ सनदी अधिकारी प्रवीण परदेशी यांची मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता नगर विकास खात्याचे प्रधान सचिव इक्बाल चहल यांनची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मुबंईत दिवसेंदिवस वाढत चाललेली कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या, आणि राज्याचे मुख्य सचिव यांच्यासोबतच्या बेबनावामुळे प्रवीण परदेशी यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याचे सांगितले जाते. परदेशी यांना आता चहल यांच्या जुन्या म्हणजेच नगर विकास खात्यात अतिरीक्त सचिव म्हणून पाठवले आहे. दरम्यान राज्याला फार परिचित नसलेले इक्बाल चहल यांच्यावर भारतातील सर्वात मोठी आणि कोरोनाच्या दृष्टीने सर्वात जास्त रुग्णसंख्या असलेल्या मुंबईची जबाबदारी पडली आहे.

कोण आहेत इक्बाल चहल?

२० जानेवारी १९६६ रोजी जन्‍मलेल्‍या चहल यांनी १२ वी परीक्षेत विज्ञान शाखेत ९६ टक्‍के गुणांसह राष्‍ट्रीय गुणवत्‍ता यादीत स्‍थान पटकावले होते. इलेक्‍ट्रॉनिक्‍स एण्‍ड इलेक्‍ट्रीकल कम्‍युनिकेशन इंजिनिअरिंग या विषयात बी. टेक. (ऑनर) ही पदवी संपादीत केल्यानंतर चहल यांनी १९८९ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षेत यश संपादन करुन सनदी सेवेमध्‍ये महाराष्‍ट्र तुकडीत प्रवेश केला.

- Advertisement -

भारतीय प्रशासकीय सेवेचा ३१ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या चहल यांनी नाशिक जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी, औरंगाबाद विभागाचे अतिरिक्‍त आयुक्‍त, औरंगाबादचे जिल्‍हाधिकारी, ठाणे जिल्‍हाधिकारी, पर्यावरण विभागाचे सहसचिव, धारावी पुनर्वसन प्रकल्‍पाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी, म्‍हाडाचे उपाध्‍यक्ष व मुख्‍य कार्यकारी अधिकारी, राज्‍य उत्‍पादन शुल्‍क आयुक्‍त, वैद्यकीय शिक्षण व औषधी विभागाचे सचिव ही पदे सक्षमतेने सांभाळली. त्‍यांच्‍या कामगिरीची दखल घेऊन केंद्र सरकारने त्‍यांना केंद्रीय गृह खात्‍याचे सहसचिव, केंद्रीय महिला व बालकल्‍याण विभागाचे सहसचिव, पंचायती राज विभागाचे सहसचिव अशा विविध पदांची जबाबदारी मार्च २०१३ ते मार्च २०१६ या कालावधीमध्‍ये सोपवली होती.

गृहनिर्माण व पुनर्वसन प्रकल्‍प, ग्रामविकास, दारिद्र्य निर्मूलन, सामाजिक न्‍याय, आदिवासी विकास या विभागांमध्‍ये भरीव योगदान दिलेल्‍या श्री. चहल यांनी जलसंपदा खात्‍यामध्‍ये केलेल्‍या कामगिरी आधारे जानेवारी २०१८ मध्‍ये महाराष्‍ट्राला उत्‍कृष्‍ट जलसिंचन व्‍यवस्‍थापनाचा केंद्रीय पुरस्‍कार प्राप्‍त झाला. त्‍यांच्‍या नेतृत्‍वात ‘सेतू’ केंद्राच्‍या यशस्‍वी कामगिरीबदृल राजीव गांधी प्रगती पुरस्‍कार, कॉम्‍प्‍युटर सोसायटी ऑफ इंड‍ियाचा राष्‍ट्रीय इ-गव्‍हर्नन्‍स पुरस्‍कार २००२ देखील मिळाला आहे. फेब्रुवारी २०१९ मध्‍ये राज्‍याला राष्‍ट्रीय जल पुरस्‍कार देखील मिळवून देण्‍यात त्‍यांचा महत्‍त्‍वाचा वाटा होता. मुंबई मॅरेथॉनमध्‍ये २००४ ते २०१८ पर्यंत सलग २१ किमी अंतराच्‍या हाफ मॅरेथॉनमध्‍ये सहभाग घेणारे धावपटू म्‍हणूनदेखील त्‍यांची वेगळी ओळख आहे.

- Advertisement -

मुंबईत प्रदिर्घ अनुभव

एक वर्षापूर्वीच चहल यांची नगर विकास खात्याच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती झाली होती. मुंबईत याआधी त्यांनी विविध खात्याच्या माध्यमातून काम केलेले आहे. मुंबईत ज्या धारावीत कोरोनाने हातपाय पसरले आहेत, त्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिलेले आहे. तसेच म्हाडाचे अध्यक्ष, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव म्हणून काम पाहिलेले आहे. त्यामुळे शहरातील इन्फ्रास्ट्रक्चर विभागातील अनुभव ते महापालिकेच्या कामी कसे आणतात, ते पाहावे लागले.

इक्बाल चहर यांनी औरंगाबाद आणि ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून देखील कारभार पाहिलेला आहे. तसे पाहायला गेले तर ठाणे आणि औरंगाबद देखील तुलनेने मोठी शहरं आहेत. या दोन्ही शहरात देखील सध्या कोरोनाचे संक्रमण दिसत आहे. तसेच चहल यांनी उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्तपदही भुषविले होते. सध्या उत्पादन शुल्क विभागाला भलतेच महत्त्व आले आहे. प्रवीण परदेशी यांनी आपल्या अधिकाराचा वापर करत दारू बंदी केल्यामुळे त्यांच्यावर बरीच टीका झाली होती. आता चहल दारूबंदीबाबत काय नियोजन करतात, ते देखील पाहणे महत्त्वाचे आहे.

फिटनेस फ्रिक अधिकारी

इक्बाल चहल हे प्रसिद्धी माध्यमांपासून लांब राहतात. फिटनेस ही त्यांची आवड आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते मुंबई मॅरेथॉनमध्ये भाग घेत आहेत. यावेळी अनेक मॅरेथॉन त्यांनी पुर्ण केल्याचे फोटो त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर दिसतात.

इक्बाल सिंह चहल यांनी काम केलेले विभाग

– नगर विकास खात्याचे प्रधान सचिव

– जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव

– धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी

– वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागाचे सचिव

– केंद्रीय गृहमंत्रालयाचे सहसचिव

– ठाणे आणि औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी

– उत्पादन शुल्क आयुक्त

– म्हाड अध्यक्ष

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -