घरमुंबईदिवाळीत नाही तर देव दिवाळीला बोनस मिळणार का?

दिवाळीत नाही तर देव दिवाळीला बोनस मिळणार का?

Subscribe

४० हजार बेस्ट कर्मचार्‍यांना बोनसची प्रतीक्षा बेस्टवर २२ कोटींचा बोजा

दिवाळी संपली तरी ४० हजार बेस्ट कर्मचार्‍यांना जाहीर झालेला साडेपाच हजार रूपये बोनस अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे बेस्ट कर्मचार्‍यांनी प्रशासनाच्या गलथान कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बोनससाठी बेस्ट महाव्यवस्थापक सुंरेद्रकुमार बागडे यांनी मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे कर्ज मागितले होते. मात्र दिवाळी संपली तरी बोनसच्या मागणीवर निर्णय न झाल्याने बेस्ट कर्मचार्‍यांची दिवाळी अंधारातच गेली. त्यामुळे आता देव दिवाळीपर्यंत तरी बोनस मिळणार का, असा सवाल बेस्ट कर्मचारी करत आहेत. थकलेला बोनसच नव्हे तर एकूणच बेस्टचा कारभार तोट्यात चालला आहे.

यंदाच्या दिवाळीत बोनस न देण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला होता. मात्र बेस्ट समिती सदस्यांच्या मागणीनंतर महाव्यवस्थापकांनी कर्मचार्‍यांना साडेपाच हजार रुपये बोनस देण्याचे जाहीर केले. यासाठी बेस्ट प्रशासनाने मुंबई महानगर पालिकाकडे कर्जाच्या स्वरूपात रक्कम मागितली होती. यासाठी बेस्ट प्रशासनाकडून पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे याबाबत पत्रव्यवहारही करण्यात आला. सद्यपरिस्थितीत बेस्टच्या एकूण ४० हजार कर्मचार्‍यांना दिवाळीचा बोनस देण्यासाठी आर्थिकदृष्ठ्या तोट्यात असणार्‍या बेस्टवर २२ कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. कर्मचार्‍यांच्या बोनसकरता बेस्टचे महाव्यवस्थापक आणि महापालिका आयुक्त यांच्यात चर्चा झाली होती. त्यावेळी महाव्यवस्थापकांनी बेस्टच्या कर्मचार्‍यांना दिवाळीचा ५,५०० रुपयांचा बोनस देणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र प्रत्यक्षात दिवाळी संपली तरी बेस्ट कर्मचार्‍यांच्या खात्यात बोनस जमा झालेला नाही. मागच्या वर्षीही बेस्टला मुंबई महानगरपालिकेकडून सानुग्रह अनुदानाकरता रक्कम देण्यात आली होती. मात्र बेस्ट प्रशासनावर आर्थिक बोजा असल्यामुळे हे सानुग्रह अनुदान बेस्ट कर्मचार्‍यांच्या पगारातून कापून घेण्यात आले होते. तेव्हासुद्धा बेस्ट कर्मचार्‍यांनी बेस्ट प्रशासना विरोधात तक्रार केली होती.

- Advertisement -

बेस्टवर सहा हजार कोटींचे कर्ज

एके काळी बेस्ट मुंबईच्या शिरपेचातील मानाचा तुरा होती. संपूर्ण भारतातील सर्वात चांगली बससेवा म्हणून बेस्टची ओळख होती. परंतु आज महापालिका प्रशासनाची ताठर भूमिका आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभावच बेस्ट उपक्रमाला मारक ठरत आहेत. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या बेस्टला नादुरुस्त ट्रायमॅक्स किंवा इंधन दरवाढ यातून बेस्टला नुकसान सोसावे लागत आहे. आज बेस्ट उपक्रमाला महिन्याला १०० कोटींचे नुकसान होत आहे. त्यामुळे आज ६ हजार कोटींपेक्षा जास्त कर्ज बेस्ट उपक्रमावर आहेत. बेस्टमध्ये ३३३७ बसचा ताफा आहे. एकूण ५०२ मार्ग असून या मार्गावर या बसेस धावतात. मात्र मागील काही वर्षांपासून सतत आर्थिक संकटात सापडल्यामुळे बेस्टला कर्मचार्‍याचे वेतनसुद्धा देणे अवघड झाले आहे.

२०१६-१७ च्या दिवाळीला बेस्ट प्रशासनाने कर्मचार्‍यांसाठी ५ हजार ५०० रुपये बोनस जाहीर केला होता. त्यामुळे बेस्ट उपक्रमावर २१ कोटी ५८ लाखाचा बोजा पडला होता. परंतु, बेस्ट उपक्रमात आर्थिक सुधारणा न झाल्याने ही रक्कम ११ समान हप्त्यांमध्ये कापून घेण्यात आली होती. अशा प्रकारे बोनस वसूल करून बी.आर अ‍ॅक्टचे उल्लंघन केल्यामुळे मान्यता प्राप्त बेस्ट कामगार संघटनांनी न्यायालयात धाव घेतली होती. यंदाही बोनस जाहीर केला. मात्र दिवाळी संपली तरी अद्यापही कर्मचार्‍यांच्या खात्यात बोनस जमा झाला नाही.
– अनिल कोकीळ, बेस्ट समिती सदस्य, शिवसेना.

- Advertisement -

दिवाळीचा बोनस बेस्ट कर्मचार्‍यांना जाहीर केला, मात्र दिवाळी संपली तरी त्यांच्या खात्यात बोनस जमा झाला नाही. ४० हजार कर्मचार्‍यांना वार्‍यावर सोडून महाव्यवस्थापक दिवाळीच्या सुट्टीसाठी विदेश दौर्‍यावर गेले. त्यामुळे कर्मचार्‍यांची दिवाळी तंगीत गेली. बेस्ट महाव्यवस्थापकांनी लवकरात लवकर तडजोड करून बेस्ट कर्मचार्‍यांना बोनस देण्यात यावा.
– जगनारायण कहार, सरचिटणीस, बेस्ट कामगार संघटना.

तर बेस्ट बंद पडेल

याबाबत पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकार्‍यांना ‘आपलं महानगर’ला सांगितले की, नफ्यात असलेली कंपनीच कर्मचार्‍यांना बोनस देते. सध्या बेस्टची आर्थिक बाजू एवढी कमकुवत झाली आहे की, सहा हजार कोटींची आर्थिक तूट आहे. तसेच पगारापोटी दरवर्षी एक हजार कोटी कर्जरुपाने घ्यावे लागतात. बोनसपोटी साडेपाच हजार द्यायचे आणि पुढील अकरा महिन्यात पाचशे रुपयांप्रमाणे ते कापून घ्यायचे ही कुठली रीत, असा सवालही त्या अधिकार्‍याने केला. मुंबई महापालिकेची आर्थिक स्थिती बेस्ट तोट्यात असल्यामुळे बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळेच लवकरच बेस्टच्या तोट्याबाबत तोडगा न काढल्यास पुढील काही वर्षात बेस्ट बंद करण्याची वेळ महापालिका प्रशासनावर येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

बेस्ट समितीच्या बैठकीमध्ये बेस्ट कर्मचार्‍यांना ५५०० रुपयांचा बोनस जाहीर केला होता. परंतु प्रशासकीय तरतूद न झाल्यामुळे कर्मचार्‍यांना बोनस अजून दिलेला नाही.बेस्ट प्रशासन यावर लवकर निर्णय घेऊन कर्मचार्‍यांना बोनस देण्यात येईल.
– आशिष चेंबूरकर, बेस्ट समिती अध्यक्ष

बेस्ट कर्मचार्‍यांना दिवाळीचा बोनस देण्यासाठी बेस्ट प्रशासनाने पालिकेकडे कर्ज मागितले आहे. याबाबतची फाईल माझ्यापर्यंत अजून आलेली नाही. गेल्यावर्षीही बेस्ट कर्मचार्‍यांना सानुग्रह अनुदान दिले होते. नंतर त्यांच्या पगारातूनच वळते केले होते. लवकरच अटी शर्ती पाहून कर्जाची रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात येईल.
– अजोय मेहता, आयुक्त, मुंबई महापालिका.

प्रति महिना बेस्टला तोटा – १०० कोटी
बेस्ट उपक्रमावर कर्ज – ६ हजार कोटी

बेस्ट उपक्रमातील कर्मचारी संख्या

बेस्ट वाहतूक विभागात ३२ हजार
बेस्ट विद्युत विभाग ६ हजार
प्रशासकीय विभाग १८२१ हजार
एकूण = ३९,८२१ हजार कर्मचारी

बेस्ट कर्मचारी संख्या   

वर्ष           एकूण
२०१६        ४३,९७२
२०१७        ४२,०३२
२०१८        ३९,८२१

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -