घरपालघरमहिला प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात; बोईसर-पालघर स्थानकादरम्यान वेडसर महिलेचा धिंगाणा

महिला प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात; बोईसर-पालघर स्थानकादरम्यान वेडसर महिलेचा धिंगाणा

Subscribe

डहाणूहून विरारकडे जात असलेल्या ट्रेनमधील महिलांच्या डब्यात घुसलेल्या एका वेडसर महिलेने प्रवाशांना उपद्रव करण्यास सुरुवात केली.

डहाणूहून विरारकडे जात असलेल्या ट्रेनमधील महिलांच्या डब्यात घुसलेल्या एका वेडसर महिलेने प्रवाशांना उपद्रव करण्यास सुरुवात केली. त्याला अटकाव करणारी महिला प्रवाशीच धक्काबुक्कीत धावत्या ट्रेनमधून पडून जखमी झाल्याची घटना बुधवारी घडली आहे. पश्चिम रेल्वेचे उपनगरीय स्थानकाचा दर्जा प्राप्त झालेल्या डहाणू ते विरार दरम्यान प्रवास करताना महिला प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. डहाणू येथून १० वाजून ५ मिनिटांनी सुटणाऱ्या लोकल ट्रेनच्या महिलांच्या डब्ब्यात एका विकृत, वेडसर महिलेने धिंगाणा घातल्याने महिला प्रवाशांत मोठी घाबरट पसरली होती. यात ३६ वर्षीय महिला पत्रकार विभुती मेस्त्री यांनी पुढाकार घेऊन महिलेला विरोध केला. मात्र, यात त्या असफल ठरल्या. त्यांनी रेल्वेच्या दोन्ही हेल्पलाईन नंबरवर मदतीसाठी फोन केला. मात्र तेही नॉट रिचेबल असल्याने संपर्क झाला नाही. अखेर ट्रेन पालघर स्थानकात आल्याने पोलिसांची मदत घेण्याच्या प्रयत्नांत धक्काबुक्कीत ट्रेनमधून पडून मेस्त्री या गंभीर जखमी झाल्या.

विभुती मेस्त्री यांनी बोईसर स्थानकातून नेहमीप्रमाणे १० वाजून २८ मिनिटांची डहाणू-विरार लोकल ट्रेन सफाळे येथील कार्यालयात जाण्यासाठी पकडली होती. लोकल ट्रेनच्या महिलांच्या डब्यामध्ये एक विकृत वेडसर महिलेने उमरोळी स्थानकापासून धिंगाणा घालून महिला प्रवाशांच्या अंगावर धावून त्यांना मारण्याचा व चालत्या गाडीतून ढकलण्याचा प्रयत्न करत होती. त्यामुळे डब्ब्यात घबराटीचे, गोंधळाचे वातावरण झाल्याने मेस्त्री यांनी व अन्य दोन महिलांनी प्रसंगावधान राखून रेल्वे पोलिसांच्या १५१२ व १३९ या दोन्ही हेल्पलाईनवर तात्काळ मदतीसाठी संपर्क केला. मात्र, दोन्ही क्रमांकावर अशा बिकट प्रसंगात संपर्क झालाच नाही.

- Advertisement -

अखेर ट्रेन पालघर स्थानकात येत असताना मेस्त्री यांनी जीवाची बाजी लावून दरवाजात येऊन रेल्वे पोलिसांना शोधण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नांत ट्रेनच्या डब्यातील गोंधळामुळे मेस्त्री या चालत्या ट्रेनमधून फलाटावर पडून रक्तबंबाळ होऊन गंभीर जखमी झाल्या. यानंतर रेल्वे पोलिसांनी तेथे धाव घेऊन विकृत महिलेला ताब्यात घेतले. तसेच स्थानकातील डॉक्टरांच्या मदतीने मेस्त्री यांच्यावर औषध उपचार करण्यात आले. मात्र महिला विकृत, वेडसर असल्याचे कारण पुढे करत पालघर लोहमार्ग पोलिसांनी तिला सोडून दिले.

पश्चिम रेल्वेच्या वैतरणा, सफाळे, केळवे रोड, पालघर, उमरोळी, बोईसर, वाणगाव व डहाणू या स्थानकांना काही वर्षांपूर्वी उपनगरीय स्थानकांचा दर्जा प्राप्त झाला होता. मात्र उपनगरीय स्थानकातील सोयी सुविधांपासून आजही येथील स्थानके बोडकीच पडली आहेत. स्थानकाच्या व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी असणारी (जीआरपी व आरपीएफ) लोहमार्ग पोलीस व रेल्वे सुरक्षा बल यांची अपुरी कर्मचारी संख्या तसेच स्थानकातील अनुचित प्रकारांवर तिसरा डोळा म्हणून सुरक्षात्मक नजर ठेवणारी सीसीटीव्ही कॅमेरे यंत्रणा बंद असल्याने आजही ही सर्व स्थानके व प्रवासी धोकादायक परिस्थितीत प्रवास करत आहेत. अशातच रेल्वे पोलिसांकडून देण्यात येणाऱ्या हेल्पलाईन क्रमांकाचे गंभीर परिस्थितीत नॉट रिचेबल असणे. महिलांच्या डब्ब्यात सुरक्षेच्या दृष्टीने महिला किंवा पुरुष पोलीस कर्मचारी दिवसा तैनात नसणे. ट्रेन स्थानकात असल्यानंतरही महिलांच्या डब्ब्याजवळ पोलीस कर्मचारी तैनात नसणे. अशा अनेक गोष्टींमुळे रेल्वे पोलीस कर्मचारी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आहेत की फक्त आर्थिक गणितात मशगूल आहेत, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

Nitesh Rane : नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल, रुग्णालयातून डिस्चार्ज

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -