घरपालघरनालेसफाईला येत्या आठवड्यात सुरुवात होणार

नालेसफाईला येत्या आठवड्यात सुरुवात होणार

Subscribe

नालेसफाईचे काम एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. स्वच्छतेच्या पूर्वीची व नंतरची छायाचित्र आणि त्याचे चित्रण करण्याचे कठोर आदेश कंत्राटदाराला देण्यात आले आहेत.

भाईंदर :- मीरा- भाईंदर शहरात दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई केली जाते. या नालेसफाईला यावर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून सुरुवात करण्यात येणार आहे. मीरा-भाईंदर शहरात महापालिकेने बनवलेले लहान मोठी अशी १५० च्या वर नाले आहेत. या नाल्यांमध्ये पावसाळ्यानंतर वर्षभर वाहून आलेला गाळ व कचरा मोठ्या प्रमाणात जमा होतो. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडचण निर्माण होते. परिणामी शहरात पाणी तुंबून रस्ते जलमय होतात. शहरात जलमय परिस्थिती निर्माण होऊन नागरिकांचे नुकसान होऊ नये, यासाठी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई केली जाते. ठेकेदार हा व्यवस्थित नालेसफाई करत नाही. कामगारांना कमी वेतन देऊन त्यांना आवश्यक सुविधा न पुरवता त्यांचे हक्काचे वेतन लाटत असल्याचा आरोप केला जातो. नालेसफाईवर करोडो रुपये खर्च करून देखील शहरात अनेक भागात पाणी साचून नागरिकांचे नुकसान होते.
त्यामुळे या नालेसफाईत ठेकेदार व मनपा अधिकारी यांच्याकडून हातसफाई केली जात असल्याचा आरोप केला जातो. त्यामुळे ही नालेसफाई दरवर्षी वादात सापडते.  यावर्षी लोकसभा निवडणूक असल्यामुळे नालेसफाईवर याचा परिणाम होऊ नये यासाठी  महापालिकेने आचारसंहिता लागण्यापूर्वीच निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यामुळे यावर्षी नालेसफाईला लवकर सुरुवात होणार आहे. दरवर्षी ही नालेसफाई उशिरा सुरू होते. त्यामुळे ही नालेसफाई घाई गडबडीत केली जाते. यावर्षी नालेसफाई लवकर सुरू होणार असली तरी लोकसभा निवडणुका असल्यामुळे अधिकारी हे निवडणूक कामात व्यस्त असणार आहेत. त्यामुळे नालेसफाई व्यवस्थित होणार की पुन्हा यावर्षी नालेसफाईच्या नावावर हातसफाई केली जाणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नालेसफाईचे काम एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. स्वच्छतेच्या पूर्वीची व नंतरची छायाचित्र आणि त्याचे चित्रण करण्याचे कठोर आदेश कंत्राटदाराला देण्यात आले आहेत. या कामासाठी यावर्षी 3 कोटी ७५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. मागील वर्षी सहा कोटी रुपयांचा खर्च स्वच्छतेच्या कामावर करण्यात आला होता. शहरातील अंतर्गत लहान नाल्यांची सफाई नियमित केली जात असल्याने खर्चात कपात करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे. नालेसफाईचे काम जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण करण्यात येणार असून नालेसफाईवर पूर्णपणे देखरेख ठेवण्यात येणार असल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांनी सांगितले आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -