वाडा :यावर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच ऊन तापत आहे. सध्या उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. तापमान अधिक वाढण्याची शक्यता ही व्यक्त केली जात आहे. मात्र, वाढत्या तापमानाचा परिणाम पशुधनावर होत आहे. त्यामुळे पशुपालकांनी आपल्या पशूंची या दिवसांमध्ये अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. कडक उन्हात जनावरांना चरण्यासाठी सोडू नये, उष्णतेमुळे गरम झालेले पाणी पशुधनास पाजणे टाळावे सदृढ राहण्यास मदत होईल. माणसाप्रमाणे पशुधनाच्या आरोग्यावर देखील उष्ण तापमानाचा परिणाम होत असतो. त्यामुळे पशुपालकांनी आपल्या पशुधनाच्या संरक्षणासाठी दक्षता घेणे गरजेचे आहे.
जनावरांना शक्यतो सकाळी व संध्याकाळच्या वेळेत करण्यासाठी सोडावे. हवामान पूरक सुधारित गोठे बांधावेत, जेणेकरून गोठ्यात हवा खेळती राहील, भिंतीला पांढरा चुना अथवा रंग लावावा. पालापाचोळा टाकावा यामुळे सूर्याची किरणे पराविक्त होण्यास मदत होईल. गोठ्याच्या सभोताल झाडे असावीत. दुपारी गोठ्या भोवती बारदान, शेडनेट लावावे. जनावरांना मोठ्या प्रमाणात थंड पाणी उपलब्ध करून द्यावे.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पशुंची अधिक काळजी घेणे गरजेचे असते.या दिवसांमध्ये दुग्ध उत्पादनावर परिणाम पडतो. तापमान वाढत असल्याने भूक मंदावते. या दिवसांमध्ये प्रजनन क्षमता आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे शक्यतो जनावरांना दुपारच्या वेळी चरण्यासाठी सोडू नये, अधिक पाणी पाजावे कोरड्या चार्यात हिरवा चारा असेल तो देण्यावर अधिक भर द्यावा.
डॉ. बाळकृष्ण पष्टे, सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी