घरपालघरमनोर -वेळगाव रस्ता धोकादायक, दुरुस्ती अभावी खड्ड्यांचे साम्राज्य

मनोर -वेळगाव रस्ता धोकादायक, दुरुस्ती अभावी खड्ड्यांचे साम्राज्य

Subscribe

वेळगाव रस्त्यावर लालबहादूर शास्त्री हायस्कूल,ज्युनिअर कॉलेज आणि मंडळ अधिकारी कार्यालय असल्याने विद्यार्थी आणि नागरिकांची मोठी वर्दळ या रस्त्यावर होत असते.

मनोर: मनोरला चिल्हार-बोईसर रस्त्याशी जोडणार्‍या मनोर- वेळगाव रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने मनोर वेळगाव रस्ता धोकादायक झाला आहे.रस्त्यावर खड्ड्यांची संख्या मोठी असल्याने वाहनचालक आणि ग्रामस्थांची गैरसोय होत आहे.प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत मनोर- वेळगाव रस्ता मंजूर असताना ठेकेदाराकडून रस्त्याच्या कामाला सुरुवात केली जात नसल्याने वाहनचालक आणि ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जात आहे. सुमारे आठ किलोमीटर अंतराच्या मनोर- वेळगाव रस्त्याने मनोर शहराला चिल्हार- बोईसर रस्त्याला जोडण्यात आले आहे.औद्योगिक वसाहतीमध्ये जाणारे कामगार,मनोरची बाजारपेठ गाठण्यासाठी अंभाण,बांधण,कोंढान आणि दामखिंड या आदिवासी बहुल गावचे ग्रामस्थ या रस्त्याचा वापर करतात.मनोर शहरातील वेळगाव फाटा ते खुशी आंगन कॉम्प्लेक्स भागात मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण झाले आहे.वेळगाव रस्त्यावर लालबहादूर शास्त्री हायस्कूल,ज्युनिअर कॉलेज आणि मंडळ अधिकारी कार्यालय असल्याने विद्यार्थी आणि नागरिकांची मोठी वर्दळ या रस्त्यावर होत असते.

मनोर शहरात वेळगाव फाट्यापासून आंबेडकर नगर,खुशी आंगन ते एचपी गॅस गोदाम,खुशी आंगण लगतच्या नाल्या पासून दामखिंड पर्यंत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.दुरुस्तीकडे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष केला जात असताना रस्त्याच्या मजबूती करणासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणे कडून सादर केलेला प्रस्ताव मंजूर झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले होते.पावसाळ्यानंतर दुरुस्ती अभावी रस्त्यावर खड्ड्यांची संख्या वाढली असून दुरुस्ती अभावी वाहनचालक आणि ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत असल्याने दुरुस्तीची मागणी जोर धरत आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया,
जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून निधी उपलब्ध होत नसल्याने मनोर- वेळगाव रस्त्याला प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेत अंतर्गत समावेश करण्याच्या सूचना माझ्याकडून देण्यात आल्या आहेत.
राजेश पाटील,आमदार

प्रतिक्रिया,
मनोर- वेळगाव रस्त्याचे काम प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर आहे.निविदा प्रक्रिया राबवण्यात आली असून पात्र निविदा मंजुरीसाठी पाठवण्यात आली आहे. मंजुरीनंतर कार्यादेश दिले जातील. त्यानंतर तात्काळ कामाला सुरुवात केली जाईल.

- Advertisement -

– रुपेश गवळी,अभियंता
प्रधानमंत्री ग्रामसडक योजना विभाग

मनोर वेळगाव रस्त्यावरील बांधण गावानजीकचा साकव पुलाचा अर्धा भाग गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये कोसळला होता.यंदाच्या पावसाळ्यात दामखिंड गावच्या हद्दीतील साकव कोसळला होता.जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सिमेंट पाईप आणि माती भराव करून वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती, त्यानंतर दोन्ही साकव पुलांचे बांधकाम करण्यात आले होते.दामखिंड भागात रस्त्याच्या मध्यभागी सिमेंट पाईपला पडलेले भगदाड माती आणि दगडाचा वापर करून बुजवण्यात आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -