घरपालघरनवीन कचरा गाड्यांतून ओला कचरा वाहतुकीदरम्यान चिखल रस्त्यावर

नवीन कचरा गाड्यांतून ओला कचरा वाहतुकीदरम्यान चिखल रस्त्यावर

Subscribe

तर याबाबत सविस्तर माहिती घेऊन संबंधित वाहनचालकावर कारवाई केली जाईल,अशी प्रतिक्रिया उपायुक्त रवि पवार यांनी दिली आहे.

भाईंदर :- मिरा- भाईंदर शहरात दैनंदिन कचरा संकलन करून त्याची वाहतूक केली जाते.परंतु, ओल्या कचऱ्याच्या वाहतुकीचे योग्य व्यवस्थापन नसल्यामुळे त्यातून निघणारे लिचड ( दुर्गंधी युक्त पाणी ) थेट रस्त्यावर पडत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरण्यासह रस्ते निसरडे होऊन दुचाकी वाहनांच्या अपघाताचा धोका वाढला आहे. तर काही दिवसांपूर्वीच रस्त्यावर पाणी असल्याने अपघात होऊन दोन वर्षांचा लहान मुलाचा मृत्यू झाला होता, त्यालाही रस्त्यावरील लीचड कारण असू शकते.

शहरातून निघणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने उत्तन येथे घनकचरा प्रकल्पाची उभारणी केली. या ठिकाणी ओला आणि सुखा कचरा वर्गीकरण करून पोहचवण्याचा महापालिकेचा प्रयत्न असतो.त्यामुळे ओल्या व सुक्या कचऱ्याची वाहतूक करण्यासाठी स्वतंत्र गाड्याची नेमणूक करण्यात आली आहे. हे काम खासगी कंत्राटदाराच्या मदतीने केले जाते. मात्र कचरा उचलणाऱ्या गाड्यांची रचना ही योग्य नसल्यामुळे ओल्या कचऱ्यातून निघणारे पाणी हे वाहतुकी दरम्यान रस्त्यावरच पडत आहे. यामुळे रस्त्यावर पाणी साचून ते निसरडे होत आहेत. शिवाय हे दुर्गंधीयुक्त पाणी पडल्यामुळे त्याचा वास सर्वत्र पसरत आहे. यामुळे अश्या वाहनाच्या मागून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

- Advertisement -

कचऱ्याची वाहतूक करत असताना त्याचा इतर वाहनांना कोणताही त्रास होऊ नये, अशी लेखी ताकीद महापालिकेने कंत्राटदाराला दिली आहे. मात्र पालिका अधिकारी या गोष्टीची पाहणी करत नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. तर याबाबत सविस्तर माहिती घेऊन संबंधित वाहनचालकावर कारवाई केली जाईल,अशी प्रतिक्रिया उपायुक्त रवि पवार यांनी दिली आहे.

चौकट :-

- Advertisement -

◆ नव्या गाड्यांच्या नंबर पाट्या गायब

मीरा- भाईंदर शहरातील कचऱ्याची वाहतूक करण्यासाठी महापालिकेने वर्षभरापूर्वीच काही गाड्या खरेदी केली आहे. मात्र या गाड्यांची वेळेत धुलाई व देखभाल केली जात नसल्यामुळे त्या आता जुन्या वाटू लागल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या गाडयांना असलेल्या नंबर पाट्या देखील गायब झाल्या आहेत. त्यामुळे वाहतूक नियमांचे पालन करण्यासह या वाहनांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वी वाहतूक नियमाचे पालन न – केल्यामुळे वाहतूक पोलिसांकडून महापालिकेवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तरी देखील महापालिका प्रशासन वाहनाच्या सुरक्षेकडे पाठ फिरवत असल्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -