Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर पालघर डोल्हारा येथील साठवण तलाव अद्याप अपूर्ण

डोल्हारा येथील साठवण तलाव अद्याप अपूर्ण

Subscribe

मोखाडा तालुक्यातील डोल्हारा या गावची परिस्थिती अत्यंत नाजूक आणि दयनीय होती. परंतु २०१२ रोजी साठवण तलाव मंजूर झाला. परंतु तलावाचे काम अद्यापही अपूर्ण अवस्थेतच आहे.

ज्ञानेश्वर पालवे – मोखाडा वार्ताहर 

मोखाडा तालुक्यातील डोल्हारा या गावची परिस्थिती अत्यंत नाजूक आणि दयनीय होती. परंतु २०१२ रोजी साठवण तलाव मंजूर झाला. परंतु तलावाचे काम अद्यापही अपूर्ण अवस्थेतच आहे. त्या तलावात खूप मोठमोठे दगड गोटे, कचरा, झाडं, साफ न करताच त्यामध्ये पाणी साठवलं आहे. त्याच पाण्याचा गावकरी पिण्यासाठी वापर करतात. साठवण तलावाची पिचिंग अपूर्ण अवस्थेत आहे. त्या पिचिंगवर दगड दिसतच नाही आणि फक्त मातीच माती दिसते. त्या तलावात खूप मोठे दगड सुद्धा तसेच आहेत. तलाव भरण्या अगोदर साफ देखील केलेला नाही. त्यामध्ये झाड त्यांची पाने कुजून कचरा साठला आहे. पाटातील दगड माती देखील काढलेली नाही. याला कोण जबाबदार, असा सवाल गावकरी करताना दिसत आहेत. साठवण तलावासाठी डोल्हारा येथील खातेदारांनी जागा उपलब्ध करून दिली आहे. ती जागा म्हणजे त्यांच्या आयुष्याची भाकरीच गेली आहे. या गोष्टीचा पच्छाताप जागा मालकांना होत आहे. तलाव मंजूर झाल्यापासून ते आजतागायत खातेदारांना जमिनीचा मोबदला मिळाला नाही.

- Advertisement -

साठवण तलावात जमीन गेल्याने शेतकरी आशेने वाट बघत आहेत. या खातेदारामध्ये एक खातेदार पैशाची वाट बघता बघता मृत्यू पावला. परंतु त्याला मोबदला मिळालेला नाही. ते खातेदार गावचे पोलीस पाटील शंकर भागा जाधव आहेत. परंतु काळाने घाव घातला. जमीन आणि पैशालाही मुकला. याही आधी तलाव मंजून झाला नव्हता. विहिरीवर पाणी-पाणी करता आदिवासी महिला पार्वती रामू जाधव हिने जीव सोडला. असे किती जणांचे जीव अजून जाणार. तरीसुद्धा मोबदला मिळणार नाही का, असा संतप्त सवाल खातेदार करत आहेत. त्यांच्यामध्ये खूप संतापाचे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थ आणि खातेदार आंदोलन करणार, असा इशारा दिला आहे.

दहा वर्ष उलटून गेले तरी अद्याप साठवण तलाव पूर्ण झालेला नाही. खातेदारा अद्याप मोबदल्यापासून वंचित आहेत. त्यामुळे आम्ही सर्वजण मिळून आंदोलन करणार आहोत.
– रघुनाथ बोढेंरे, ग्रामस्थ खातेदार, डोल्हारा

- Advertisement -

मूळ बंधारा आणि पाणीसाठा यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी पूर्ण केल्या आहेत. डाऊनस्टिंगची पिचिंग बाकी आहे. त्यामुळे बंधाऱ्याला धोका नाही. ठेकेदारांनी पिचिंग केलेली नाही. खातेरांच्या मोबदल्याच्या बाबतीत विचारणा आणि चौकशी करून सांगतो.
– एन. एस. मोहिते, उपअभियंता, लघु व पाठ बंधारे विभाग, जव्हार/मोखाडा

अपूर्ण अवस्थेतील साठवण तलाव लवकरात लवकर पूर्ण करावा. त्यानंतर त्याचा ताबा हा ग्रामपंचायतला द्यावा. खातेदारांना त्यांच्या जमिनीचा मोबदला लवकरात लवकर शासनाकडून मिळावा.
– प्रदीप वाघ, माजी सभापती, पंचायत समिती सदस्य, पंचायत समिती मोखाडा

 

हेही वाचा –

राज्यातील धरणांमध्ये ४१ टक्के पाणीसाठा

- Advertisment -