घररायगडमाथेरानमध्ये दोन दिवसात ७८९ जणांनी केला ई-रिक्षा प्रवास

माथेरानमध्ये दोन दिवसात ७८९ जणांनी केला ई-रिक्षा प्रवास

Subscribe

सोमवारपासून ई-रिक्षाला हिरवा कंदील दाखवला आणि शालेय विद्यार्थी,ज्येष्ठ नागरिक तसेच पर्यटक यांना ये-जा करण्यासाठी एक पर्याय मिळाला. त्यामुळे पर्यटकांसह स्थानिक तसेच सामान्यांचीही पहिली पसंती ई-रिक्षाला मिळत असून या सेवेमुळे पर्यटकांसह नागरिक ही समाधानी असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. अवघ्या दोन दिवसात ७८९ प्रवाशांनी प्रवास केल्याची आकडेवारी असून वाहतुकीसाठी येथे उत्तम पर्याय ठरलेली ई-रिक्षा सुसाट धावत असल्याचे स्पष्ट होत आहे.

दिनेश सुतार/ माथेरान
सोमवारपासून ई-रिक्षाला हिरवा कंदील दाखवला आणि शालेय विद्यार्थी,ज्येष्ठ नागरिक तसेच पर्यटक यांना ये-जा करण्यासाठी एक पर्याय मिळाला. त्यामुळे पर्यटकांसह स्थानिक तसेच सामान्यांचीही पहिली पसंती ई-रिक्षाला मिळत असून या सेवेमुळे पर्यटकांसह नागरिक ही समाधानी असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. अवघ्या दोन दिवसात ७८९ प्रवाशांनी प्रवास केल्याची आकडेवारी असून वाहतुकीसाठी येथे उत्तम पर्याय ठरलेली ई-रिक्षा सुसाट धावत असल्याचे स्पष्ट होत आहे.
सर्वोच्च न्यायालयाने तीन महिन्यांच्या प्रायोगिक तत्वावर ई-रिक्षा सुरू करण्याचे आदेश दिल्यानंतर राज्य सरकार,सनियंत्रण समिती यांनी नगरपालिकेला याबाबत सूचना केल्या त्या सूचनांचे पालन करत नगरपालिकेने सर्व परवानग्या मिळवत सात ई-रिक्षा विकत घेऊन पुढील तीन महिन्यांसाठी माथेरानमध्ये धावू लागल्या आहेत.सनियंत्रण समितीचे सचिव तथा रायगड जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यावर लक्ष ठेऊन होते.शालेय विध्यार्थी,दिव्यांग बांधव,महिला तसेच स्थानिक तसेच विविध विभागाचे अधिकारी यांनी स्वागत करत ई-रिक्षाचे साक्षीदार झाले.
सकाळी नऊ नंतर नागरिक आणि पर्यटकांसाठी दस्तुरी ते माथेरान रेल्वे स्थानक या दोन किलोमीटर अंतरावर धावू लागली.ई-रिक्षा कमी लोकांची प्रवास आसन संख्या असल्याने दस्तुरी आणि रेल्वे स्टेशन या दोन्हीकडे प्रवाशांची लाईन पहावयास मिळाली.

ई -रिक्षा धावण्याची वेळ सकाळी ६ ते रात्री १०
ई -रिक्षा धावण्याची वेळ सकाळी ६ ते रात्री १०अशी असून आसन संख्या ३ प्रवासी इतकी आाहे. तिकीट दर(एक बाजूने) विद्यार्थी -५ रुपये तर सामान्य प्रवासी, पर्यटक ३५ रुपये असून सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसात ७८९ जणांनी प्रवास केला असून २७, ६१५ रुपये इतके उत्पन्न मिळाले असल्याची माहिती देण्यात आली. ई-रिक्षा कर्मचारी संख्या पाहता चालक १६, तिकीट निरीक्षक ६, देखरेख निरीक्षक २ आणि इतर कामांसाठी २ असे मनुष्यबळ आहे. ई -रिक्षा चार्जिंग वेळ १ तास,१०० टक्के चार्जिंगमध्ये १३० किलोमीटर मायलेज देते.

- Advertisement -

विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर आनंद
ई-रिक्षा सुरू झाल्यानंतर सर्वप्रथम सुरवात ही विद्यार्थी आणि दिव्यांग तसेच ज्येष्ठ नागरिक यांच्यापासून झाली आणि नंतर पर्यटकांना याचा आगळावेगळा प्रवास करता आला.गेल्या दोन दिवसांमध्ये पहिल्या दिवशी, सोमवारी फक्त सायंकाळी सात वाजेपर्यंत ही सेवा सुरू होती पण दुसर्‍या दिवशी सकाळी सहा वाजता विद्यार्थ्यांना या रिक्षांमधून वेगवेगळ्या ठिकाणाहून शाळेपर्यंत सोडण्यात आले.त्यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर वेगळाच आनंद दिसत होता.

वाहतुकीसाठी इतर पर्यायही सुरू
ई-रिक्षा धावत असताना घोडा, हातरीक्षा आणि मिनिट्रेन देखील सुरू होते.ई-रिक्षा फक्त रेल्वे स्थानकापर्यंत धावत होती.इतर ठिकाणी फिरण्यासाठी घोडा आणि हातरीक्षामध्ये पर्यटक फिरत होते.ज्यांना ई-रिक्षा पसंत होती त्यांनी ई-रिक्षांमध्ये प्रवास केला,ज्यांना मिनिट्रेन पसंत आहे त्यांनी मिनिट्रेन ने जाणे पसंत केले.ज्यांना लाल मातीतून घोड्यावर फिरायचे होते त्यांनी घोड्यावर जाणे पसंत केले.या सर्व पर्यायांमुळे पर्यटकांना इच्छित स्थळी जाणे,प्रेक्षणीय स्थळे फिरणे सोयीचे झाले.

- Advertisement -

आम्ही पाच किलोमीटर चालत होतो.चालताना पाय दुखायचे ,कंटाळा यायचा पण वडिलांनी रिक्षा गाडीत बसविले त्यामुळे रोज सकाळी आम्ही फ्रेंड्स गाडीतून शाळेपर्यंत जातो आणि शाळा सुटली की पुन्हा गाडीमधून येतो.आता खूप मजा वाटते.
– उन्नती केतन रामाणे, विद्यार्थिनी

 

——————————————————-

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -