घरक्रीडाभुवनेश्वर जायबंदी; २-३ सामन्यांना मुकणार

भुवनेश्वर जायबंदी; २-३ सामन्यांना मुकणार

Subscribe

क्रिकेट विश्वचषकात रविवारी झालेल्या सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा डकवर्थ-लुईस नियमानुसार ८९ धावांनी पराभव करत भारताने चार सामन्यांतील तिसरा विजय मिळवला. मात्र, या विजयाला काहीसे गालबोट लागले, कारण मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या डाव्या पायाला दुखापत झाली. भारताची गोलंदाजी सुरू असताना पाचव्या षटकात त्याला गोलंदाजीदरम्यानच ही दुखापत झाली. त्यामुळे तो हे षटकही पूर्ण करू शकला नाही. आता या दुखापतीमुळे त्याला किमान २-३ सामन्यांना मुकावे लागणार आहे, अशी माहिती भारताचा कर्णधार विराट कोहलीने सामन्यानंतर दिली.

भुवनेश्वरला दुखापत झाली असली, तरी ती फारशी गंभीर नाही. गोलंदाजी करताना त्याचा पाय घसरल्यामुळे त्याला ही दुखापत झाली. तो यापुढील दोन-तीन सामन्यांत खेळू शकणार नाही, पण तो लवकरच संघात परतेल असे मला वाटते. तो आमच्यासाठी खूप महत्त्वाचा गोलंदाज असल्याने तो लवकरच फिट होईल अशी मला आशा आहे. त्याच्या अनुपस्थितीत मोहम्मद शमीला संधी मिळणार आहे. शमी या संधीची आतुरतेने वाट पाहत होता, असे कोहली म्हणाला.

- Advertisement -

भारताचे यापुढील तीन सामने अफगाणिस्तान (२२ जून), वेस्ट इंडिज (२७ जून) आणि यजमान इंग्लंड (३० जून) यांच्याविरुद्ध होणार आहेत. भुवनेश्वरने भारताच्या या विश्वचषकातील पहिल्या दोन विजयांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याने सलामीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २ आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ विकेट्स पटकावल्या होत्या. भुवनेश्वर हा या विश्वचषकादरम्यान दुखापतग्रस्त झालेला भारताचा दुसरा खेळाडू आहे. याआधी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात सलामीवीर शिखर धवनच्या डाव्या अंगठ्याला दुखापत झाली होती. या अंगठ्याला फ्रॅक्चर झाल्याने तो उर्वरित स्पर्धेला मुकेल अशीही शक्यता वर्तवली जात होती, पण तो फिट होण्याची आशा असल्याने संघ व्यवस्थापनाने त्याला संघासोबतच ठेवण्याचा निर्णय घेतला.

इंग्लंडच्या रॉयलाही दुखापत

- Advertisement -

विश्वचषकात दुखापतींचा फटका बसलेला भारत हा एकमेव संघ नाही. हा विश्वचषक जिंकण्यासाठी प्रमुख दावेदार असणार्‍या यजमान इंग्लंड संघाचा सलामीवीर जेसन रॉयच्या पायाला दुखापत झाली आहे. या दुखापतीमुळे तो इंग्लंडच्या पुढील किमान दोन सामन्यांत खेळू शकणार नाही. रॉयला ही दुखापत वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना झाली होती. त्यामुळे या सामन्यात तो फलंदाजी करू शकला नव्हता. इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनही पाठ दुखीमुळे पुढील सामन्याला (अफगाणिस्तानविरुद्ध) मुकण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -