घरक्रीडावर्ल्डकपमध्ये यंदा चालणार आखूड टप्प्याचा मारा!

वर्ल्डकपमध्ये यंदा चालणार आखूड टप्प्याचा मारा!

Subscribe

गोलंदाजीत ’लाईन’ आणि ’लेंथ’ सर्वात महत्त्वाची समजली जाते, ही बाब इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वषचकातील वेगवान गोलंदाजांच्या यशावरून पुन्हा एकदा सिद्ध होते. आतापर्यंतच्या जवळपास सर्वच सामन्यांमध्ये वेगवान गोलंदाजांनी लक्षवेधी कामगिरी केली असली, तरी ज्या फलंदाजांनी हा वेगवान मारा परतवून लावला आहे, त्यांना मोठी खेळी करण्यात यश आले आहे. या विश्वचषकात वेगवान गोलंदाजांचा भर आखूड टप्प्याचा मारा करण्यावर असल्याचे पाहायला मिळत आहे. यजमानांसह सर्वच देशांच्या गोलंदाजांनी आतापर्यंत झालेल्या सामन्यांत उसळी घेणारे चेंडू टाकत फलंदाजांना अडचणीत टाकले आहे. बांगलादेश आणि भारताच्या फलंदाजांनी मात्र हा मारा योग्यरित्या परतावून लावत मोठी धावसंख्या उभारली, ही बाब विसरून चालणार नाही.

पाकिस्तानाचा धुराडा उडविणाऱ्या विंडीजने पहिल्या सामन्यात अत्यंत वेगवान आणि आखूड टप्प्याचा, शरीराचा वेध घेणारा मारा केला. त्यामुळे पाकिस्तानी फलंदाज गोंधळले. प्रत्युत्तरात पाकनेही हीच रणनिती अवलंबली. इंग्लंडमधील मैदाने आणि खेळपट्ट्या यामध्ये आता बदल झाल्याने काही मोजके सामने सोडले तर मोठ्या धावसंख्या झालेले सामने पाहायला मिळाले. यातील बांगलादेशने केलेली ३३०ची धावसंख्या आणि तिचा पाठलाग करताना आफ्रिकेने केलेल्या ३०९ धावा हे एक चांगले उदाहरण म्हणता येईल. या सामन्यातही मुस्तफिजूर रहमान, मोहम्मद सैफुद्दिनने आखूड आणि शरीराचा वेध घेणारा मारा करीत बळी मिळवले, परंतु दोघांनीही सातच्या इकोनॉमीने धावा मोजल्या. आफ्रिकेच्या इंगिडी आणि रबाडानेही काहीसे हेच तंत्र अवलंबले, मात्र त्यांना योग्य टप्प्यावर गोलंदाजी करण्यात अपयश आले. परिणामी दोघांनाही एकही बळी मिळवता आला नाही. हे सर्व खेळपट्टीने दाखवलेल्या रंगामुळे नव्हे, तर गोलंदाज आणि कर्णधार्यांच्या विचारक्षमतेमुळे झाल्याचे दिसून येते. भारताच्या जसप्रीत बुमराहने पहिल्याच सामन्यात दोन महत्त्वाचे फलंदाज तंबूत धाडले, मात्र त्यानंतर खेळपट्टीचे रूप आणि आफ्रिकेची स्थिती ओळखून कर्णधार विराट कोहलीने कुलदीप-चहलचा वापर करून आफ्रिकेला रोखले. त्यामुळे केवळ वेगवान आणि आखूड टप्प्याचा माराच विजयाचा पाया रचू शकेल, असे नाही हे भारत-द.आफ्रिकेच्या सामन्यात स्पष्ट झाले.

- Advertisement -

भारताच्या विजयाचे अन् रोहितच्या यशाचे रहस्य

भारताच्या फलंदाजांनी द.आफ्रिकेचा तेजतर्रार मारा सहज परतावून लावला. याही सामन्यात सातत्याने आखूड टप्प्यांवर मारा करणार्या द.आफ्रिकन गोलंदाजांना रोहित शर्मा, राहुल, धोनी यांनी लय सापडू दिली नाही. खासकरून रोहितने अत्यंत धाडसाने आफ्रिकन मारा परतवून लावत शंभरी पार केली. शरीराचा वेध घेणारे चेंडू त्याच्या इतके दुसरा कुणी फलंदाज जलदगतीने ओळखून सीमारेषेपार धाडू शकत नाही, हे सर्वपरिचितच आहे. मुंबईकरांची तशी आखूड टप्प्याच्या चेंडूवर पकड मजबूतच म्हटली जाते. एकूणच यंदाच्या विश्वचषकात वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व लक्षवेधी ठरत असले, तरी त्याला योग्य फलंदाजी तंत्राने मात देता येईल, याची झलक काही सामन्यांत दिसून येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -