घरक्रीडाCopa America : ब्राझील की अर्जेंटिना? कोपा अमेरिका स्पर्धेच्या जेतेपदासाठी चुरस

Copa America : ब्राझील की अर्जेंटिना? कोपा अमेरिका स्पर्धेच्या जेतेपदासाठी चुरस

Subscribe

नेयमार आणि मेस्सी या सध्याच्या स्टार खेळाडूंना कोपा अमेरिका स्पर्धा एकदाही जिंकता आलेली नाही.

लिओनेल मेस्सी आणि नेयमार हे बार्सिलोना संघातील माजी सहकारी आमनेसामने येणार असून अर्जेंटिना व ब्राझील या संघांमध्ये कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. भारतीय फुटबॉल चाहत्यांना रविवारी सुट्टीच्या दिवशी सकाळीच कोपा अमेरिका स्पर्धेच्या जेतेपदासाठीची चुरस पाहायला मिळणार आहे. भारतीय वेळेनुसार या सामन्याला रविवारी सकाळी ५.३० वाजता सुरुवात होणार आहे. जगातील सर्वोत्तम फुटबॉल म्हणून मेस्सी आणि क्रिस्तिआनो रोनाल्डो यांच्यात कायम स्पर्धा असते. परंतु, नेयमार या दोघांपेक्षा फार मागे नाही.

मेस्सीसाठी अखेरची संधी?

ब्राझीलचे पेले आणि अर्जेंटिनाचे दिएगो मॅराडोना या महान फुटबॉलपटूंप्रमाणेच नेयमार आणि मेस्सी या सध्याच्या स्टार खेळाडूंना कोपा अमेरिका स्पर्धा एकदाही जिंकता आलेली नाही. मात्र, आता या दोघांपैकी एकाचा हा जेतेपदाचा दुष्काळ संपणार आहे. कोपा अमेरिका स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळण्याची ही ३४ वर्षीय मेस्सीची चौथी आणि बहुधा अखेरची वेळ असणार आहे. मेस्सीने यंदाच्या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली असून चार गोल आणि पाच असिस्टची नोंद केली आहे.

- Advertisement -

मेस्सीला पराभूत करण्यास नेयमार उत्सुक 

दुसरीकडे २९ वर्षीय नेयमारसाठी ही जेतेपद पटकावण्याची अखेरची संधी नसली, तरी तो विशेषतः मेस्सीला पराभूत करण्यासाठी उत्सुक असेल. दोन वर्षांपूर्वी ब्राझीलने कोपा अमेरिका स्पर्धा जिंकली होती. मात्र, दुखापतीमुळे नेयमार त्या स्पर्धेत खेळू शकला नव्हता. त्यामुळे या दोघांमधील, तसेच यजमान ब्राझील आणि अर्जेंटिना या तुल्यबळ संघांमधील द्वंद्वाकडे जगभरातील फुटबॉल चाहत्यांचे लक्ष असणार आहे.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -