घरक्रीडापाकचे गोलंदाज फ्लॉप, रोहितमुळे भारत टॉप

पाकचे गोलंदाज फ्लॉप, रोहितमुळे भारत टॉप

Subscribe

सलामीवीर रोहित शर्माच्या उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या विश्वचषकातील सामन्यात ५० षटकांत ५ बाद ३३६ अशी धावसंख्या उभारली. रोहितचे हे या विश्वचषकातील दुसरे, तर एकदिवसीय क्रिकेटमधील २४ वे शतक होते. त्याला या सामन्यात कर्णधार विराट कोहली (७७) आणि सलामीचा साथी लोकेश राहुल (५७) यांनी चांगली साथ दिली. त्यांच्या चांगल्या फलंदाजीपुढे पाकिस्तानचे गोलंदाज निष्प्रभ ठरले. केवळ वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरलाच चांगली गोलंदाजी करण्यात यश आले.

ओल्ड ट्रॅफोर्डवरील हा सामना सुरु होण्याआधी ढगाळ वातावरण असल्याने पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. शिखर धवनच्या अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे अपेक्षेनुसार रोहित शर्मासह लोकेश राहुल सलामी करण्यासाठी आला. राहुलने डावाची सावध सुरुवात केली. मात्र, रोहितने आक्रमक शैलीत फलंदाजी करत अवघ्या ३४ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. राहुलनेही सेट झाल्यानंतर धावांची गती वाढवल्यामुळे १८ व्या षटकात भारताचे शतक फलकावर लावले. सलामीवीर म्हणून मिळालेल्या संधीचा फायदा घेत राहुलने ६९ चेंडूत एकदिवसीय क्रिकेटमधील आपले तिसरे अर्धशतक पूर्ण केले. मात्र, ५७ धावांवर असताना राहुलला वहाब रियाझने बाद करत ही जोडी फोडली. त्याने आणि रोहितने पहिल्या विकेटसाठी १३६ धावांची भागीदारी केली. रोहितने मात्र आपली दमदार फलंदाजी सुरु ठेवत ८५ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्यामुळे पाकिस्तानविरुद्ध विश्वचषकात शतक करणारा तो दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याला कर्णधार कोहलीने चांगली साथ दिली. या दोघांनी दुसर्‍या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी केली. मात्र, हसन अलीच्या गोलंदाजीवर खराब फटका मारून रोहित बाद झाला. त्याने ११३ चेंडूत १४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने १४० धावा फटकावल्या.

- Advertisement -

पुढे फटकेबाजी करण्यासाठी हार्दिक पांड्याला चौथ्या क्रमांकावर बढती देण्यात आली. त्याने आपली भूमिका चोख पार पाडत १९ चेंडूत २६ धावांची खेळी केली, पण मोहम्मद आमिरला षटकार लागवण्याच्या नादात तो बाद झाला. अनुभवी महेंद्रसिंग धोनी फारकाळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही आणि अवघी १ धाव केल्यावर त्यालाही आमिरने माघारी पाठवले. कोहलीने मात्र एक बाजू लावून धरत ५१ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. ४७ व्या षटकात पावसाला सुरुवात झाल्याने खेळ थांबवण्यात आला. त्यामुळे फलंदाजांची लय बिघडली. कोहली ७७ धावांवर असताना त्याला आमिरने सर्फराजकरवी झेलबाद केले. मात्र, रिप्लेमध्ये चेंडू बॅटला न लागल्याचे दिसले, पण तरीही कोहली पॅव्हेलियनमध्ये गेला. यानंतर विजय शंकर आणि केदार यांना फटकेबाजी करण्यात अपयश आले. त्यामुळे भारताने ५० षटकांत ५ विकेट गमावत ३३६ धावा केल्या.

धोनी ठरला भारतासाठी दुसरा सर्वाधिक वनडे खेळणारा खेळाडू

भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी भारतासाठी सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळणार्‍या खेळाडूंच्या यादीत दुसर्‍या स्थानी पोहोचला आहे. रविवारी पाकिस्तानविरुद्धचा सामना हा धोनीच्या एकदिवसीय कारकिर्दीतील एकूण ३४४ वा, तर भारतासाठी ३४१ वा सामना होता. त्याने ३ सामने आशियाई इलेव्हन संघासाठी खेळले आहेत. त्यामुळे धोनीने भारतासाठी सर्वाधिक सामने खेळणार्‍या खेळाडूंच्या यादीत माजी कर्णधार राहुल द्रविडला मागे टाकले. द्रविडने भारतासाठी ३४० एकदिवसीय सामने खेळले होते. या यादीत महान सचिन तेंडुलकर अव्वल स्थानी असून त्याने ४६३ एकदिवसीय सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले.

- Advertisement -

रोहितचे विक्रमी शतक

भारताचा सलामीवीर रोहित शर्माने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ११३ चेंडूत १४० धावांची खेळी केली. हे त्याचे एकदिवसीय क्रिकेटमधील २४ वे शतक होते. या त्याच्या कामगिरीमुळे तो पाकिस्तानविरुद्ध विश्वचषकाच्या सामन्यात भारतासाठी शतक करणारा केवळ दुसरा फलंदाज ठरला आहे. याआधी २०१५ विश्वचषकात विराट कोहलीने अ‍ॅडिलेड येथे झालेल्या सामन्यात १०७ धावांची खेळी केली होती. त्याआधी २००३ विश्वचषकात सचिन तेंडुलकरने पाकिस्तानविरुद्ध ९८ धावा केल्या होत्या.

संक्षिप्त धावफलक –

भारत : ५० षटकांत ५ बाद ३३६ (रोहित शर्मा १४०, विराट कोहली ७७, लोकेश राहुल ५७, हार्दिक पांड्या २६; मोहम्मद आमिर ३/४७) वि. पाकिस्तान.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -