घरक्रीडाकिवीजची भरारी

किवीजची भरारी

Subscribe

वर्ल्डकप स्पर्धेत सातत्यपूर्ण खेळ करणारा संघ म्हणून न्यूझीलंडचे नाव घ्यावे लागेल. ऑस्ट्रेलियाने ५ वेळा वर्ल्डकप पटकावला आहे. त्यांचा शेजारी असलेल्या न्यूझीलंडने (किवीज) ११ पैकी ६ वर्ल्डकप स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. गतवेळच्या वर्ल्डकपमध्ये त्यांनी अंतिम फेरी गाठली, परंतु त्यांना उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले. यंदाही जेतेपदाच्या शर्यतीत यजमान इंग्लंड तसेच भारत, ऑस्ट्रेलिया यांची नावे आग्रक्रमाने घेतली जातात. मात्र, न्यूझीलंडचा अभावानेच उल्लेख केला जातो.

इंग्लंडमधील वातावरण न्यूझीलंडला साजेसेच. ढगाळ कुंद वातावरणात चेंडू स्विंग होतो. न्यूझीलंडमधील खेळपट्ट्या मात्र तेज गोलंदाजांना अनुकूल. इंग्लंडमधील खेळपट्ट्यांचे स्वरूप खासकरून लंडनमधील ओव्हल, लॉर्ड्स, तसेच ट्रेंट ब्रिज-नॉटिंगहॅमची खेळपट्टी फलंदाजीसाठी नंदनवन. त्रिशतकी धावसंख्या ही तर नित्याचीच बाब, परंतु लंडन, मिडलँड्सपासून दुर्बल असलेल्या कौंटीतील खेळपट्ट्या गोलंदाजांना अनुकूल. ब्रेंडन मॅक्युलमकडून न्यूझीलंड संघाच्या नेतृत्त्वाची धुरा केन विल्यमसनकडे सोपवण्यात आली. विल्यमसनच्या संघात मॅट हेन्री, ट्रेंट बोल्ट, फर्ग्युसन, टीम साऊदी, कॉलिन डी ग्रँडहोम असे तेज गोलंदाजांचे पंचक असून स्विंग, सीम गोलंदाजीला पोषक खेळपट्ट्यांवर किवीजची गोलंदाजी घातक ठरू शकते. पहिल्या दोन सामन्यांत याची प्रचिती आली. मॅट हेन्रीच्या गोलंदाजीपुढे श्रीलंकन, तसेच बांगलादेशी फलंदाजांची तारांबळ उडाली. या सामन्यांत ३ आणि ४ असे एकूण ७ मोहरे टिपून त्याने प्रतिस्पर्धी संघांना खिंडार पाडले. त्याला तोलामोलाची साथ मिळाली ती बोल्ट, फर्ग्युसनची. रिचर्ड हॅडली, जेफ अ‍ॅलटसारख्या चतुरस्त्र तेज गोलंदाजांचा वारसा लाभलेल्या किवजीची बोल्ट, हेन्री आणि फर्ग्युसन या तेज त्रिकुटावर मदार आहे. श्रीलंकेला ३० षटकांत १३६ धावांत गुंडाळणार्‍या न्यूझीलंडने बांगलादेशला २४४ धावांवर रोखले. कार्डिफ पाठोपाठ ओव्हलवरील ढगाळ वातावरणाचा चांगला फायदा न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी उठवला. खेळपट्टी फिरकीला अनुकूल असल्यास मिचेल सँटनर, ईश सोधीसारखी फिरकी जोडगोळी त्यांच्याकडे आहे.

- Advertisement -

मार्टिन गप्टिल, विल्यमसन, रॉस टेलर, टॉम लेथम अशी फलंदाजांची मजबूत फळी ही किवीजची जमेची बाजू. प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर प्रतिहल्ला करण्यात गप्टिल पटाईत असून कर्णधार केन विल्यमसन, टेलर यांच्यासारखे प्रथित यश फलंदाज कुठल्याही गोलंदाजीला नेटाने सामोरे जाऊ शकतात. कोहली, स्मिथ, जो रुट या यशस्वी कर्णधार-फलंदाजांच्या यादीत विल्यमसनचाही समावेश करण्यात येतो. कॉलिन मुनरो, मार्टिन गप्टिल या बिनीच्या जोडीने श्रीलंकेची १३६ धावसंख्या आरामात पार केल्याने किवीजना विजयी सलामी दिली. ओव्हलवर बांगलादेशविरुद्ध न्यूझीलंडला कडव्या प्रतिकाराला सामोरे जावे लागले. रॉस टेलरने आपला सारा अनुभव पणाला लावत ८२ धावा फाटकावल्यामुळे किवीजचा विजय सुकर झाला. शनिवारी किवीजची लढत होईल अफगाणिस्तानशी. यानंतर मात्र त्यांना तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांना सामोरे जावे लागले. चार वर्षांपूर्वी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवरील (एमसीजी) अंतिम लढतीत यजमान ऑस्ट्रेलियाने कमालीच्या एकतर्फी लढतीत न्यूझीलंडचा धुव्वा उडवला. अंतिम फेरी प्रथमच गाठणार्‍या किवीजची कामगिरी निराशाजनक ठरली. याच वर्ल्डकपमध्ये गप्टिलने विंडीजविरुद्ध नाबाद २३७ धावांची खणखणीत खेळी केली. मात्र, अंतिम फेरीत त्याच्यासह इतरांनीही सपशेल शरणागती पत्करल्यामुळे क्रिकेट शौकिनांची निराशा झाली.

अनुभवी फलंदाजांची चौकडी, अष्टपैलूंची भरणा, तेज गोलंदाजांचे पंचक, फिरकी जोडगोळी यामुळे न्यूझीलंड संघ परिपूर्ण वाटतो. सलामीच्या सोप्या लढतीनंतर बलवान प्रतिस्पर्ध्यांना किवीज कशी झुंज देतात यावर त्यांची स्पर्धेतील वाटचाल अवलंबून असेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -