घरक्रीडाकसोटी क्रिकेट जिवंत ठेवण्यासाठी भारताचा सहभाग महत्त्वाचा - चॅपल

कसोटी क्रिकेट जिवंत ठेवण्यासाठी भारताचा सहभाग महत्त्वाचा – चॅपल

Subscribe

करोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्व बहुतांश खेळ बंद असून क्रिकेटही याला अपवाद नाही. जवळपास दोन महिन्यांत क्रिकेटचा एकही सामना झालेला नाही. याचा मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर फारसा परिणाम होणार नाही. मात्र, करोनामुळे कसोटी क्रिकेटचे खूप नुकसान होऊ शकेल अशी भीती ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज आणि भारताचे माजी कर्णधार ग्रेग चॅपल यांनी व्यक्त केली. एकदिवसीय आणि खासकरून टी-२० मुळे मागील काही काळात चाहते आणि बरेचसे खेळाडू कसोटी क्रिकेटकडे पाठ फिरवताना पाहायला मिळाले आहेत.

ज्यादिवशी भारत कसोटी खेळणे बंद करेल, त्यादिवशी कसोटी क्रिकेट संपेल. भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्या व्यतिरिक्त इतर देश युवा खेळाडूंना कसोटी क्रिकेट खेळण्यास फारसे प्रोत्साहन देत नाहीत. मी टी-२० क्रिकेटच्या विरोधात नाही. चाहत्यांना टी-२० क्रिकेटकडे वळवणे सोपे आहे. कसोटी क्रिकेटचे मात्र काहीसे वेगळे चित्र आहे. कसोटीसाठी कोणी प्रायोजकत्व देण्यास लवकर तयार होत नाही. चाहतेदेखील अनेकदा त्याकडे पाठ फिरवतात. भविष्यात ही समस्या वाढताना दिसू शकेल. मात्र, त्याच वेळी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ‘कसोटी’ला क्रिकेटचा सर्वोत्तम प्रकार म्हणून संबोधतो. त्यामुळे कसोटी क्रिकेट जिवंत राहील अशी आशा निर्माण होते, असे चॅपल म्हणाले.

- Advertisement -

चॅपल यांनी २००५ ते २००७ या काळात भारतीय संघाचे प्रशिक्षकपद भूषवले. या काळात अनेक वादांना तोंड फुटले. त्यांच्यात आणि भारताच्या अनुभवी खेळाडूंमध्ये बरेचदा मतभेदही झाले. याबाबत चॅपल यांनी सांगितले की, मी प्रशिक्षक असताना भारतीय संघात त्या काळचे काही सर्वोत्तम खेळाडू होते आणि त्यांना न दुखावता पुढील पिढीला तयार करणे, हे माझ्यासमोरील सर्वात मोठे आव्हान होते. तो भारतीय संघ क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम संघांपैकी एक होता. मात्र, त्यांना अपेक्षित यश मिळवता आले नाही.

धोनी सर्वोत्कृष्ट फिनिशर!

- Advertisement -

महेंद्रसिंग धोनी हा क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट फिनिशर आहे, अशा शब्दांत ग्रेग चॅपल यांनी भारताच्या माजी कर्णधाराची स्तुती केली. धोनी हा मी पाहिलेला सर्वात शक्तीशाली खेळाडू आहे. त्याने श्रीलंकेच्या गोलंदाजांची धुलाई करत १८३ धावा केल्या होत्या. त्यानंतरचा सामना पुण्यात झाला, ज्यात आम्हाला जिंकण्यासाठी २६० धावांची गरज होती. आम्ही याचा पाठलाग करताना सुस्थितीत होतो. त्यामुळे मी धोनीला चेंडू मैदानालगत मारण्यास सांगितले. मात्र, आम्हाला जिंकण्यासाठी २० धावांची गरज असताना, मी आता षटकार मारु शकतो का, असे धोनीने मला राखीव खेळाडू असणार्‍या आरपी सिंहकरवी विचारले. तर मी त्याला इतक्यात नाही असे सांगितले. मला अजूनही आठवते, आम्हाला सहा धावा हव्या असताना धोनीने षटकार मारुन सामना संपवला. संघाला सामना जिंकवून दिल्यावर तो खूप खुश व्हायचा. माझ्या मते तोच क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट फिनिशर आहे, असे चॅपल यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -