घरक्रीडामुंबईची पुन्हा घसरगुंडी!

मुंबईची पुन्हा घसरगुंडी!

Subscribe

 कर्नाटकविरुद्ध पहिल्या डावात अवघ्या १९४ धावा

फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीचा फटका पुन्हा एकदा मुंबईला बसला. बांद्रा-कुर्ला संकुलात होत असलेल्या कर्नाटकाविरुद्धच्या रणजी सामन्यात मुंबईचा पहिला डाव अवघ्या १९४ धावांतच आटोपला. पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणे हे कसोटीपटू चांगली कामगिरी करण्यात पुन्हा एकदा अपयशी ठरले. २०० पेक्षाही कमी धावसंख्या करण्याची मुंबईची ही सलग तिसरी वेळ होती. रेल्वेविरुद्धच्या मागील रणजी सामन्याच्या दोन्ही डावांत त्यांना द्विशतकी मजल मारता आली नव्हती.

या सामन्यात कर्नाटकाचा कर्णधार करुण नायरने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. गोलंदाजांना अनुकूल परिस्थितीचा फायदा कर्नाटकाला सुरुवातीपासूनच झाला. कौशिकने सामन्याच्या दुसर्‍याच षटकात अनुभवी सलामीवीर आदित्य तरेला यष्टीरक्षक शरथकरवी झेलबाद केले. तर रोनित मोरेने रहाणे (७) आणि सिद्धेश लाड (४) यांना माघारी पाठवले. दुसर्‍या बाजूने पृथ्वीने काही चांगले फटके लगावले. मात्र, ५७ चेंडूत ६ चौकारांसह २९ धावा केल्यावर त्याला अभिमन्यू मिथूनने बाद केले. तब्बल तीन वर्षांनी मुंबई रणजी संघात पुनरागमन करणारा सर्फराज खानही फार काळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. डावखुरा मध्यमगती गोलंदाज प्रतीक जैनने सर्फराज (८) आणि शम्स मुलानी (०) माघारी पाठवत पहिल्याच सत्रात मुंबईची ६ बाद ६० अशी अवस्था केली.

- Advertisement -

उपहारानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव आणि शशांक अत्तारडे यांनी मुंबईचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सातव्या विकेटसाठी अवघ्या ९२ चेंडूत ८८ धावा जोडल्या. इतर फलंदाजांना अपयश असताना सूर्यकुमारने पुन्हा एकदा कर्णधाराला साजेशी खेळी केली. त्याने लेगस्पिनर श्रेयस गोपाळच्या एकाच षटकात १९ धावा चोपून काढल्या. अखेर कौशिकने अत्तारडेला (३५) अभिषेक रेड्डीकरवी झेलबाद करत ही जोडी फोडली. सूर्यकुमारही फटकेबाजी करण्याच्या नादात माघारी परतला. त्याने ९४ चेंडूत १० चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ७७ धावांची खेळी केली. तळाच्या फलंदाजांना फारसे योगदान देता न आल्याने मुंबईचा डाव चहापानाआधी १९४ धावांवर आटोपला. कौशिक (३ बळी), मिथून (२ बळी), मोरे (२ बळी) आणि जैन (२ बळी) या वेगवान चौकडीने मिळून ९ मोहरे टिपले.

याचे उत्तर देताना कर्नाटकाचे सलामीवीर देवदत्त पडिक्कल आणि समर्थ यांनी डावाची दमदार सुरुवात केली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी रचली. वेगवान गोलंदाजांना विकेट मिळवण्यात अपयश येत असल्याने कर्णधार सूर्यकुमारने चेंडू डावखुरा फिरकीपटू मुलानीकडे सोपवला. मुलानीने एकाच षटकात पडिक्कल (३२) आणि रेड्डी (०) यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. तर ऑफस्पिनर अत्तारडेने रोहन कदमला (४) बाद करत कर्नाटकाला आणखी एक झटका दिला. त्यामुळे त्यांची पहिल्या दिवसअखेर ३ बाद ७९ अशी धावसंख्या होती.

- Advertisement -

संक्षिप्त धावफलक – मुंबई : पहिला डाव – ५५.५ षटकांत सर्वबाद १९४ (सूर्यकुमार ७७, अत्तारडे ३५, पृथ्वी २९; कौशिक ३/४५) वि. कर्नाटक : पहिला डाव – २४ षटकांत ३ बाद ७९ (समर्थ नाबाद ४०, पडिक्कल ३२; मुलानी २/१३).

पृथ्वीच्या खांद्याला दुखापत
कर्नाटकाविरुद्धच्या रणजी सामन्यात क्षेत्ररक्षण करताना मुंबईचा युवा खेळाडू पृथ्वी शॉच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली. त्यामुळे त्याला मैदानाबाहेर जावे लागले. मात्र, पृथ्वीची तितकीशी दुखापत गंभीर नसल्याचे पहिल्या दिवसाच्या खेळानंतर कर्णधार सूर्यकुमारने सांगितले. मैदानात असताना पृथ्वीची दुखापत फार गंभीर वाटली होती. मात्र, आता तो आधीपेक्षा बरा आहे. फिजिओशी बोलल्यानंतर मला नक्की काय ते कळेल, असे सूर्यकुमार म्हणाला. पृथ्वीची आगामी न्यूझीलंड दौर्‍यासाठी भारत ’अ’ संघात निवड झाली आहे. भारताचा संघ न्यूझीलंडसाठी १० जानेवारीला रवाना होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -