घरक्रीडापालघर, ठाणे, मुंबई शहर संघांची आगेकूच

पालघर, ठाणे, मुंबई शहर संघांची आगेकूच

Subscribe

राजाभाऊ देसाई चषक कबड्डी

पालघर, ठाणे, मुंबई शहर या संघांनी स्वामी समर्थ क्रीडा मंडळ आयोजित राजाभाऊ चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. या फेरीत कोल्हापूरचा सामना रायगडशी, रत्नागिरीचा सामना सांगलीशी, मुंबई शहरचा सामना पालघरशी, तर मुंबई उपनगरचा सामना ठाण्याशी होईल.

या स्पर्धेच्या दुसर्‍या दिवशी पालघर आणि पुणे यांच्यातील सामना चुरशीचा झाला. दोन्ही संघांनी आपले सलामीचे सामने गमावल्याने त्यांना या सामन्यात विजय मिळवणे महत्त्वाचे होते. अक्षय शिंदे आणि पवन करंडेच्या चढायांमुळे सामना संपायला दोन मिनिटे शिल्लक असताना पुण्याकडे ३६-२९ अशी मोठी आघाडी होती. परंतु, अरविंद पाटील आणि राहुल सवर या दोघांनी झंझावाती खेळ करत पालघरला हा सामना ३८-३७ असा जिंकवून दिला. त्यामुळे पालघरने बाद फेरीत प्रवेश केला, तर पुण्याचे आव्हान साखळीतच संपुष्टात आले. पहिल्या दिवशी पुण्यावर मात करणार्‍या रायगडने पालघरचा ४८-३२ असा पराभव केला.

- Advertisement -

दुसरीकडे रत्नागिरीविरूद्धची लढत २७-२७ अशी बरोबरीत संपल्याने नंदुरबारचा संघ साखळीतच बाद झाला. या सामन्यात अखेरची तीन मिनिटे शिल्लक असताना रत्नागिरीकडे २२-१९ अशी आघाडी होती. परंतु, दादासो आवाडने अप्रतिम चढाया करत नंदुरबारला सामन्यात बरोबरी करुन दिली. त्याआधी नंदुरबारचा ठाण्याने अवघ्या एका गुणाने पराभव केला होता. तसेच कोल्हापूरने अहमदनगरला ३९-३६ असे पराभूत केले. त्यांच्या या विजयात अक्षय पाटील आणि ऋषिकेश गावडे हे खेळाडू चमकले. मात्र, कोल्हापूरचा दुसर्‍या सामन्यात मुंबई शहरने १४-३८ असा पराभव केला. परंतु, या पराभवानंतरही त्यांना बाद फेरी गाठण्यात यश आले.

रायगड, मुंबई उपनगर अपराजित!
मुंबई शहर, रायगड आणि मुंबई उपनगर या तीन संघांनी राजाभाऊ देसाई चषक कबड्डी स्पर्धेतील आपले दोन्ही साखळी सामने जिंकले. त्यामुळे त्यांनी सहजपणे बाद फेरी गाठली. पुणे, नाशिक, अहमदनगर या तीन संघांना दोन्ही सामन्यांत पराभवांना सामोरे जावे लागले. नंदुरबारने एक सामना गमावला आणि त्यांचा एक सामना बरोबरीत संपला. त्यामुळे त्यांना स्पर्धेबाहेर व्हावे लागले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -