घरक्रीडागिलला सलामीला संधी द्या!

गिलला सलामीला संधी द्या!

Subscribe

हरभजन सिंगचे उद्गार

भारताचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉने नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मात्र, चांगल्या सुरुवातीनंतर त्याने विकेट फेकल्याचे पाहायला मिळाले. दुसरीकडे युवा फलंदाज शुभमन गिलने भारत अ संघाचे प्रतिनिधित्व करताना न्यूझीलंड अ संघाविरुद्ध पहिल्या कसोटीत द्विशतक, तर दुसर्‍या सामन्यात शतक झळकावले. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत मयांक अगरवालसोबत गिलला भारताच्या डावाची सुरुवात करण्याची संधी मिळाली पाहिजे, असे मत हरभजन सिंगने व्यक्त केले.

गिलला सलामीवीर म्हणून संधी मिळाली पाहिजे. तो बर्‍याच काळापासून भारतीय कसोटी संघाचा भाग आहे, पण त्याला एकही सामना खेळायला मिळालेला नाही. मयांकने कसोटीत स्वतःला सिद्ध केले असून तो खूपच चांगला फलंदाज आहे. कसोटी सामन्यात मोठी खेळी कशी करायची हे त्याला ठाऊक आहे. एकदिवसीय मालिकेत धावांसाठी झुंजावे लागले म्हणून तुम्ही त्याला कसोटी संघातून वगळू शकत नाही. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीत मयांक आणि गिलने भारताच्या डावाची सुरुवात केली पाहिजे, असे हरभजन म्हणाला.

- Advertisement -

पृथ्वीला त्याची जागा मिळाली पाहिजे!
हरभजन सिंगच्या मताशी भारताचा माजी यष्टीरक्षक-फलंदाज दीप दासगुप्ता सहमत नाही. शुभमन गिल फॉर्मात आहे याबाबत शंका नाही. मात्र, पृथ्वी शॉने मयांक अगरवालच्याही आधी कसोटीत पदार्पण केले हे आपण विसरता कामा नये. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेआधी दुखापत झाल्याने त्याला संघाबाहेर व्हावे लागले. त्यामुळे आता त्याला त्याची जागा परत मिळाली पाहिजे, असे दासगुप्ता म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -