घरक्रीडारविंद्र जाडेजाच्या फलंदाजीमध्ये झालेली सुधारणा वाखाणण्याजोगी - लक्ष्मण

रविंद्र जाडेजाच्या फलंदाजीमध्ये झालेली सुधारणा वाखाणण्याजोगी – लक्ष्मण

Subscribe

जाडेजाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्यात २३ चेंडूत नाबाद ४४ धावांची खेळी केली.

रविंद्र जाडेजा भारताचा प्रमुख अष्टपैलू म्हणून ओळखला जातो. त्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासून डावखुऱ्या फिरकीने विकेट मिळवल्या असल्या तरी त्याच्या फलंदाजीत सातत्याचा अभाव होता. मात्र, त्याने मागील एक-दोन वर्षांत फलंदाज म्हणूनही चांगली कामगिरी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे फलंदाज म्हणून जाडेजामध्ये झालेली सुधारणा वाखाणण्याजोगी आहे, असे मत भारताचा माजी क्रिकेटपटू व्ही. व्ही. एस लक्ष्मणने व्यक्त केले. तसेच लक्ष्मणने हार्दिक पांड्याचेही कौतुक केले.

हार्दिक त्याच्या फटकेबाजीसाठी ओळखला जातो. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत तो संयमानेही खेळू शकतो हे स्पष्ट झाले. त्याच्यात सामन्याच्या परिस्थितीनुसार खेळण्याची क्षमता आहे. त्याच्या फलंदाजीचा भारताला पुढील काळातही नक्कीच फायदा होईल. तसेच जाडेजानेही मला खूप प्रभावित केले आहे. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत त्याने न्यूझीलंडविरुद्ध अर्धशतकी खेळी केली होती. त्यानंतर त्याच्या फलंदाजीत झालेली सुधारणा वाखाणण्याजोगी आहे. त्याने आता फलंदाज म्हणून विचार करण्यास सुरुवात केली आहे, असे लक्ष्मण म्हणाला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात जाडेजा (नाबाद ६६) आणि हार्दिक (९२) यांनी शतकी भागीदारी रचत भारताचा डाव सावरला होता. तसेच जाडेजाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्यात २३ चेंडूत नाबाद ४४ धावांची खेळी केली.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -