घरIPL 2020IPL 2020 : कोहली, पडिक्कलचे अर्धशतक; आरसीबीचा विजय

IPL 2020 : कोहली, पडिक्कलचे अर्धशतक; आरसीबीचा विजय

Subscribe

आरसीबीने गुणतक्त्यात अव्वल स्थानावर झेप घेतली आहे.  

कर्णधार विराट कोहली, तसेच सलामीवीर देवदत्त पडिक्कल यांनी केलेल्या अर्धशतकांच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आयपीएलच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघावर ८ विकेट राखून मात केली. हा बंगळुरूचा सलग दुसरा आणि चार सामन्यांतील तिसरा विजय होता. त्यामुळे त्यांनी गुणतक्त्यात अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. यंदा आयपीएलमध्ये एका दिवशी दोन सामने होण्याची ही पहिलीच वेळ होती आणि दुपारी झालेल्या या सामन्यात कोहलीच्या बंगळुरू संघाने बाजी मारली.

चहलच्या तीन विकेट

या सामन्यात राजस्थानचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. त्यांच्या डावाची अडखळती सुरुवात झाली. फॉर्मात असलेले स्मिथ (५) आणि संजू सॅमसन (४) हे फलंदाज फारकाळ खेळपट्टीवर टिकू शकले नाहीत. जॉस बटलरने काही चांगले फटके मारत १२ चेंडूत २२ धावांची खेळी केल्यावर त्याला नवदीप सैनीने माघारी पाठवले. सॅमसनला बाद करणाऱ्या युजवेंद्र चहलने रॉबिन उथप्पालाही (१७) पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यंदा आपला पहिलाच सामना खेळणाऱ्या महिपाल लोमरारने चांगली फलंदाजी केली. त्याने ३९ चेंडूत १ चौकार आणि ३ षटकांराच्या मदतीने ४७ धावांची खेळी केल्यावर त्यालाही चहलने बाद केले. अखेरच्या षटकांमध्ये राहुल तेवातिया (१२ चेंडूत नाबाद २४) आणि जोफ्रा आर्चर (१० चेंडूत नाबाद १६) यांनी फटकेबाजी केल्याने राजस्थानने २० षटकांत ६ बाद १५४ अशी धावसंख्या उभारली.

- Advertisement -

पडिक्कलचे तिसरे अर्धशतक 

१५५ धावांचा पाठलाग करताना सलामीवीर देवदत्त पडिक्कलने बंगळुरूच्या डावाची दमदार सुरुवात केली. परंतु, त्याला फिंचची (८) फार काळ साथ मिळाली नाही. यानंतर मात्र पडिक्कलने कर्णधार विराट कोहलीच्या साथीने बंगळुरूच्या डावाला आकार दिला. पडिक्कलने मागील तीन पैकी दोन सामन्यांत अर्धशतक केले होते. हा चांगला फॉर्म त्याने कायम ठेवत या सामन्यातही ३४ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. कोहलीला यंदाच्या मोसमात अपेक्षित कामगिरी करण्यात अपयश येत होते. परंतु, या सामन्यात त्याला सूर गवसला. त्याने ४१ चेंडूत आपले यंदाच्या मोसमातील आपले पहिले अर्धशतक झळकावले. त्याने आणि पडिक्कलने दुसऱ्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी रचली. मात्र, जोफ्रा आर्चरने पडिक्कलला (६३) बाद करत बंगळुरूला दुसरा झटका दिला. परंतु, कोहली आणि एबी डिव्हिलियर्स यांनी उर्वरित धावा करत बंगळुरूला विजय मिळवून दिला. कोहली ७२ धावांवर नाबाद राहिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -