घरक्रीडाIND vs ENG : विराट, रोहितची अर्धशतके; भारताचा टी-२० मालिका विजय 

IND vs ENG : विराट, रोहितची अर्धशतके; भारताचा टी-२० मालिका विजय 

Subscribe

भारताने पाच सामन्यांची ही मालिका ३-२ अशी खिशात घातली.

कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांनी केलेल्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने पाचव्या टी-२० सामन्यात इंग्लंडचा ३६ धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने पाच सामन्यांची ही मालिका ३-२ अशी खिशात घातली. पाचव्या आणि निर्णायक सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. भारताने या सामन्यासाठी सलामीवीर लोकेश राहुलला संघातून वगळले. त्यामुळे रोहितच्या साथीने विराटने भारताच्या डावाची सुरुवात केली. या दोघांनी ८.६ षटकांत ९४ धावांची भागीदारी रचली. रोहितने अवघ्या ३४ चेंडूत ६४ धावांची खेळी केली. दुसऱ्या बाजूने सावध सुरुवात करणाऱ्या विराटने अंतिम षटकांत फटकेबाजी करत ५२ चेंडूत नाबाद ८० धावा केल्या. त्याला सूर्यकुमार यादव (३२) आणि हार्दिक पांड्या (नाबाद ३९) यांची उत्तम साथ लाभली. त्यामुळे भारताने २० षटकांत २ बाद २२४ अशी धावसंख्या उभारली.

मलान, बटलरच्या खेळी वाया

२२५ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉयला भुवनेश्वर कुमारने खातेही न उघडता बाद केले. यानंतर डाविड मलान (६८) आणि जॉस बटलर (५२) यांनी दुसऱ्या विकेटसाठी १३० धावांची भागीदारी रचत इंग्लंडच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. मात्र, हे दोघे बाद झाल्यावर इतरांना फारसे योगदान देता आले नाही. त्यामुळे इंग्लंडला २० षटकांत ८ बाद १८८ धावाच करता आल्या. त्यामुळे भारताने हा सामना ३६ धावांनी जिंकला. भारताकडून भुवनेश्वर कुमारने १५ धावांत २ विकेट, तर शार्दूल ठाकूरने ४५ धावांत ३ विकेट घेतल्या.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -