घरक्रीडाशंकरची गोलंदाजी इंग्लंडमध्ये ठरेल फायदेशीर

शंकरची गोलंदाजी इंग्लंडमध्ये ठरेल फायदेशीर

Subscribe

विजय शंकरच्या गोलंदाजीचा भारतीय संघाला इंग्लंडमध्ये फायदा होईल, असे मत भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीने व्यक्त केले आहे. ३० मेपासून इंग्लंडमध्ये सुरु होणार्‍या क्रिकेट विश्वचषकासाठी अष्टपैलू शंकरची निवड झाली आहे. या संघात शंकर, अंबाती रायडू आणि रिषभ पंत यांच्यापैकी कोणाची निवड होणार याबाबत बरीच चर्चा सुरु होती. मात्र, शंकर गोलंदाजीही करू शकतो म्हणून त्याचा या संघात समावेश करण्यात आला आहे. निवड समितीचा हा निर्णय योग्यच होता असे गांगुलीला वाटते.

विजय शंकर या विश्वचषकात चांगली कामगिरी करेल याची मला खात्री आहे. तो एक चांगला युवा खेळाडू आहे. त्याची गोलंदाजी इंग्लंडमध्ये फायदेशीर ठरेल. त्याच्याबाबत नकारात्मक पद्धतीने बोलण्याची काहीच गरज नाही. त्याला विश्वचषकासाठी संघात संधी मिळाली कारण त्याने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये चांगले प्रदर्शन केले, असे गांगुली म्हणाला.

- Advertisement -

गांगुली सध्या आयपीएल संघ दिल्ली कॅपिटल्सचा सल्लगार म्हणून काम करत आहे. दिल्ली संघाकडून खेळणार्‍या रिषभ पंतची विश्वचषकाच्या संघात निवड झालेली नाही. याबाबत गांगुली म्हणाला, पंत नक्कीच या संघाचा भाग असू शकला असता. मात्र, त्याला फार चिंता करण्याची आणि निराश होण्याची गरज नाही. तो फक्त २० वर्षांचा आहे. तो यानंतर बरेच विश्वचषक खेळेल.

तसेच भारतीय चमूत फक्त तीनच प्रमुख वेगवान गोलंदाज आहेत. हे तिघेही संघात खेळतील का, असे विचारले असता तो म्हणाला, हार्दिक पांड्या हा भारताचा प्रमुख अष्टपैलू आहे. त्यामुळे तो या संघात खेळणारच. त्याला दुखापत झाली, तर रविंद्र जाडेजा संघात आहेच. त्यामुळे या संघात तीनही वेगवान गोलंदाज खेळू शकतील. जर त्यांच्यापैकी कोणाला दुखापत झाली, तर इंग्लंडला जायला विमानाने अवघे १० तसेच लागतात.

- Advertisement -

इंग्लंडमध्ये होणारा विश्वचषक जिंकण्याचे भारताला प्रबळ दावेदार मानले जात आहे. मात्र, या स्पर्धेत सर्व संघ सर्वांशीच सामने खेळणार असल्याने कोणत्याही संघाला ही स्पर्धा जिंकणे सोपे नसेल असे गांगुलीचे मत आहे. याप्रकारची स्पर्धा पहिल्यांदा १९९२ मध्ये झाली होती, जेव्हा प्रत्येक संघ सर्व संघांशी सामना खेळला होता. याआधीच्या विश्वचषकांमध्ये तुम्हाला एक-दोन संघ माहित होते, ज्यांना हरवणे सोपे असू शकते. मात्र, यावेळी कोणताही संघ तसा वाटत नाही. वेस्ट इंडिजचा संघ मजबूत आहे, ऑस्ट्रेलियाही आता चांगली कामगिरी करत आहे. भारत आणि न्यूझीलंडचाही संघ चांगला आहे. पाकिस्ताननेही इंग्लंडमध्ये चांगले प्रदर्शन केले आहे. त्यामुळे प्रत्येक सामन्यात तुम्हाला सर्वोत्तम खेळ करावा लागेल, असे गांगुली म्हणाला.

दिल्लीच्या चांगल्या कामगिरीचे श्रेय खेळाडूंचे

दिल्ली कॅपिटल्सने ७ वर्षांनंतर आयपीएलच्या प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या या चांगल्या कामगिरीचे श्रेय सल्लागार असलेल्या सौरव गांगुली आणि प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगला दिले जात आहे. मात्र, हे श्रेय माझे नाही, असे गांगुली म्हणाला. आमच्या संघाने प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला आहे, याचे श्रेय या संघात खेळणार्‍या खेळाडूंना दिले पाहिजे. आम्ही फक्त त्यांना मार्गदर्शन करतो आणि त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतो. मी जेव्हा कर्णधार होतो, तेव्हाही संघातील खेळाडू कसे खेळतात, यावर संघाची कामगिरी ठरते. त्यामुळे संघाच्या चांगल्या कामगिरीचे श्रेय खेळाडूंना मिळायला पाहिजे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -