घरक्रीडाराज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा

Subscribe

जयदत्त क्रीडा मंडळ आयोजित राज्यस्तरीय ज्युनियर स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दुर्गामाता स्पोर्ट्सने एस. एस. जी फाउंडेशनचा ३७-३४ असा पराभव करत स्वप्नसाफल्य चषक आपल्या नावे केला. त्याचप्रमाणे त्यांना रोख रुपये एकवीस हजार मिळाले. दुर्गामाताचाच प्रथमेश पालांडे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. त्याला आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. मुंबई शहर ज्युनियर निवड चाचणी स्पर्धेत याच दोन संघात लढत झाली होती आणि त्यातही दुर्गामातानेच बाजी मारली होती.

मुंबईतील दोन तूल्यबळ संघात झालेली ही लढत अत्यंत चुरशीची झाली. पहिल्या डावात दोन्ही संघांनी चांगली सुरुवात केली, पण दुर्गामाताने या डावात मिळविलेले ५ बोनस गुण त्यांच्या कामी आले. त्यामुळे विश्रांतीला दुर्गामाताला २१-१८ अशी आघाडी मिळाली होती. दुसर्‍या डावात दुर्गामाताने बोनस रेषा पार करण्यावर भर देत ७ बोनस गुणांची कमाई केली. एस. एस. जीला पूर्ण डावात अवघा १ बोनस गुण मिळविता आला. हा बोनस गुणांतील फरकच शेवटी या विजयात महत्त्वाचा ठरला. करण कदमचा झंजावाती अष्टपैलू खेळ आणि त्याला प्रथमेश पालांडेने चढाईत दिलेली उत्कृष्ट साथ दुर्गामाताच्या विजयात महत्त्वाची ठरली. एस. एस. जीच्या पंकज मोहिते, ओमकार पोरे यांनी चांगली झुंज दिली.

- Advertisement -

त्याआधी झालेल्या उपांत्य फेरीतील सामन्यात दुर्गामाताने श्रीराम संघाला ३७-१५ असे, तर एस. एस. जी फाऊंडेशनने सह्याद्री मित्र मंडळाचा ४३-३९ असे पराभूत करीत अंतिम फेरीत धडक दिली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -