घरक्रीडाथॉमस, गेलचा झंझावात, विंडीजची इंग्लंडवर मात

थॉमस, गेलचा झंझावात, विंडीजची इंग्लंडवर मात

Subscribe

ओशेन थॉमस आणि क्रिस गेलच्या दमदार कामगिरीच्या जोरावर वेस्ट इंडिजने पाचव्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा ७ विकेट राखून पराभव केला. त्यामुळे या दोन संघांतील ५ सामन्यांची मालिका २-२ अशी संपली. अखेरच्या सामन्यात ओशेन थॉमसने ५ विकेट घेतल्यामुळे चौथ्या सामन्यात ४१८ धावांचा डोंगर उभारणार्‍या इंग्लंडचा डाव ११३ धावांतच आटोपला.

या मालिकेत १-२ असे मागे पडल्यामुळे विंडीजला हा सामना जिंकणे अनिवार्य होते. विंडीजचा कर्णधार जेसन होल्डरने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. जॉनी बेरस्टोव (११) आणि जो रूट (१) झटपट बाद झाल्याने इंग्लंडची २ बाद १८ अशी अवस्था होती. यानंतर अ‍ॅलेक्स हेल्स आणि कर्णधार इऑन मॉर्गनने ३९ धावांची भागीदारी करत इंग्लंडचा डाव सावरला. मात्र, हेल्सला २३ धावांवर असताना कार्लोस ब्रेथवेटने माघारी पाठवले, तर थॉमसने १८ धावांवर मॉर्गनला बाद केले. यानंतर ६ पैकी ४ विकेट थॉमसनेच घेत इंग्लंडचा डाव ११३ धावांत संपवला. ओशेन थॉमसने २१ धावांतच ५ विकेट घेतल्या. हेल्सनंतर जॉस बटलरलाच २० धावांचा टप्पा पार करता आला. इंग्लंडचे ४ फलंदाज आपले खातेही उघडू शकले नाहीत.

- Advertisement -

११४ धावांचा पाठलाग करताना विंडीजने सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी केली. खासकरून क्रिस गेलने ३ चौकार आणि ६ षटकारांची आतिषबाजी करत अवघ्या १९ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने पुढेही आपले आक्रमण सुरू ठेवले. अखेर ७७ धावांवर त्याला मार्क वूडने बाद केले. त्याने या धावा २७ चेंडूंत ५ चौकार आणि ९ षटकारांच्या मदतीने केल्या. तो बाद झाल्यावर डॅरेन ब्रावो आणि शिमरॉन हेटमायरने उर्वरित धावा करत विंडीजला विजय मिळवून दिला. विंडीजने ११४ धावांचे लक्ष्य अवघ्या १२.१ षटकांत गाठले. या मालिकेत १०६ च्या सरासरीने ४२४ धावा करणार्‍या गेलला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला. गेलने या मालिकेतील ५ सामन्यांच्या ४ डावांत मिळून विक्रमी ३९ षटकार लगावले.

संक्षिप्त धावफलक –

- Advertisement -

इंग्लंड : २८.१ षटकांत सर्वबाद ११३ (अ‍ॅलेक्स हेल्स २३, जॉस बटलर २३; ओशेन थॉमस ५/२१) पराभूत वि. वेस्ट इंडिज : १२.१ षटकांत ३ बाद ११५ (क्रिस गेल ७७, शाई होप १३; मार्क वूड २/५५).

विंडीजपासून सावधान – ड्वेन ब्रावो

मे महिन्यात सुरू होणार्‍या विश्वचषकाचा प्रमुख दावेदार मानल्या जाणार्‍या इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडिजने खूप चांगले प्रदर्शन केले. त्यामुळे आत्मविश्वास उंचावलेल्या विंडीजचा विश्वचषकात सामना करणे कोणत्याही संघाला सोपे नसेल असे त्यांचा माजी खेळाडू ड्वेन ब्रावो म्हणाला. ‘आमच्याकडे (विंडीज) खूप चांगले युवा खेळाडू आहेत. हे खेळाडू सामन्यागणिक आपल्या खेळात सुधारणा करत आहेत. त्यांनी जगातील अव्वल संघ इंग्लंडविरुद्ध ज्याप्रकारे कामगिरी केली, ते पाहून खूप बरे वाटले. मी कर्णधार जेसन होल्डरशी बोललो आहे आणि मला वाटते की विश्वचषकात या विंडीज संघाचा सामना करणे कोणालाही सोपे नसेल’, असे ब्रावो म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -