घरक्रीडाTokyo Paralympics : क्रीडा दिनी पॅरालिम्पिकमध्ये भारताची दमदार कामगिरी, पदकांची हॅटट्रिक!

Tokyo Paralympics : क्रीडा दिनी पॅरालिम्पिकमध्ये भारताची दमदार कामगिरी, पदकांची हॅटट्रिक!

Subscribe

थाळीफेकीच्या पुरुष एफ-५२ प्रकारात भारताच्या विनोद कुमारने कांस्यपदक जिंकले.

भारतीय खेळांसाठी रविवारचा दिवस खास ठरला. महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी (२९ ऑगस्ट) क्रीडा दिन साजरा केला गेला. भारताच्या पॅरा-खेळाडूंनी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo Paralympics) एकाच दिवशी तीन पदके जिंकत ध्यानचंद यांना जणू मानवंदना दिली. टेबल टेनिसपटू भाविना पटेलने दिवसाची सुरुवात रौप्यपदक जिंकत केली. तिच्या या कामगिरीतून प्रेरणा घेत उंच उडी क्रीडा प्रकारात निषाद कुमारने रौप्यपदक, तर थाळीफेकमध्ये विनोद कुमारने कांस्यपदक आपल्या नावे केले.

भारताच्या निषाद कुमारने पुरुष उंच उडीच्या टी-४७ प्रकारात रौप्यपदक जिंकतानाच आशियाई विक्रमही प्रस्थापित केला. २१ वर्षीय निषादने २.०६ मीटरची उंची पार केली. अमेरिकेच्या डॅलास वाईसनेही २.०६ मीटरची उंची पार केल्याने त्याने आणि निषादने रौप्यपदकाची कमाई केली. या स्पर्धेत अमेरिकेच्या रॉड्रिक टाऊन्सएन्डने २.१५ मीटर इतकी उंच उडी मारत जागतिक विक्रमासह सुवर्णपदक पटकावले.

- Advertisement -

तसेच थाळीफेकीच्या पुरुष एफ-५२ प्रकारात भारताच्या विनोद कुमारने कांस्यपदक जिंकले. ४१ वर्षीय विनोदने १९.९१ मीटर अंतराची नोंद केली. या स्पर्धेत पोलंडच्या पीटर कोसेविजने (२०.०२ मीटर) सुवर्ण, तर क्रोएशियाच्या वेलिमिर सॅंडोरने (१९.९८ मीटर) रौप्यपदक मिळवले. त्याआधी पॅरा टेबल टेनिसपटू भाविना पटेलने यंदाच्या पॅरालिम्पिक स्पर्धांत भारताचे पदकांचे खाते उघडून दिले होते. भाविनाला महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या चीनच्या यिंग होऊने ०-३ असे पराभूत केले. मात्र, अंतिम फेरी गाठल्याने भाविनाला रौप्यपदक जिंकण्यात यश आले.

भाविनाला गुजरात सरकारकडून रोख बक्षीस

पॅरालिम्पिक स्पर्धांच्या इतिहासात पदक जिंकणारी भाविना पटेल ही भारताची केवळ दुसरी महिला खेळाडू ठरली. तिच्या या उत्कृष्ट कामगिरीची गुजरात सरकार आणि भारतीय टेबल टेनिस फेडरेशनने दखल घेतली. गुजरातच्या सुंधिया गावची रहिवासी असलेल्या भाविनाला गुजरात सरकारकडून ३ कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर करण्यात आले. तसेच हरयाणाचे उपमुख्यमंत्री आणि भारतीय टेबल टेनिस फेडरेशनचे अध्यक्ष दुष्यंत चौटाला यांनी फेडरेशनच्या माध्यमातून भाविनाला ३१ लाख लाख रुपयांचे रोख बक्षीस देणार असल्याची घोषणा केली.

- Advertisement -

हेही वाचा : भाविना पटेलनं टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारताला जिंकून दिलं पहिलं पदक, रौप्यपदकावर कोरलं नाव


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -