घरक्रीडाविक्रमी किवी कर्णधार!

विक्रमी किवी कर्णधार!

Subscribe

इंग्लंडमधील विश्वचषकात विविध संघांतील फलंदाजांनी विविध विक्रम प्रस्थापित केले. यात भारताच्या रोहित शर्मासह इयॉन मॉर्गन, जो रूट, जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, शाकिब अल हसन, डेविड वॉर्नर, स्टिव्ह स्मिथ या फलंदाजांचा समावेश होतो. मात्र, या सर्व फलंदाजांत एक नाव अपेक्षेनुसार झळकले, ते म्हणजे किवीजचा कर्णधार केन विल्यमसन.

त्याच्या या कामगिरीमुळे किवीजचा संघ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचला. यजमान इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात विल्यमसनने पहिली धाव काढायला तब्बल १२ चेंडू घेतले. मात्र, ही धाव घेताच त्याने एका विश्वचषकात सर्वाधिक धावा करणार्‍या कर्णधारांच्या पंगतीत अव्वल स्थान पटकावत नवा विक्रम रचला.

- Advertisement -

एका विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम यापूर्वी श्रीलंकेच्या महेला जयवर्धनेच्या नावावर होता. जयवर्धनेने वेस्ट इंडिजमध्ये २००७ साली खेळल्या गेलेल्या नवव्या विश्वचषक स्पर्धेत कर्णधार म्हणून खेळताना ५४८ धावा केल्या होत्या. यंदाच्या विश्वचषकात न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व करताना केन विल्यमसनने अंतिम सामन्यातील ३० धावा मिळून एकूण ५७८ धावा करत नवीन विक्रम प्रस्थापित केला.

८३ हून अधिकची सरासरी असलेल्या विल्यमसनने या स्पर्धेत दोन शतके आणि दोन अर्धशतके झळकावली आहेत. त्याचबरोबर यंदाच्या विश्वचषकात त्याने १४८ धावांची खेळीही साकारली आहे. भारताविरुद्धच्या उपांत्य सामन्यातही विल्यमसनने ६७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत न्यूझीलंडला अंतिम फेरीत पोहोचवले. चिवट फलंदाजी आणि कुठल्याही खेळपट्टीवर तग धरण्याची क्षमता हे विल्यमसनच्या खेळाचे वैशिष्ठ्य! या विश्वचषकाप्रमाणेच इतर आंतरराष्ट्रीय सामन्यांतही विल्यमसनची आकडेवारी लक्ष्यवेधी ठरली आहे.

- Advertisement -

दृष्टिक्षेपात
केन विल्यमसनने आजवर ७२ कसोटी सामन्यांच्या १२७ डावांत ६१३९ धावा केल्या आहेत. यात त्याची सर्वाधिक धावसंख्या नाबाद २४२ आहे. कसोटीत २० शतके त्याच्या नावावर आहेत. एकदिवसीय सामन्यांतही त्याची कामगिरी लक्ष्यवेधीच आहे. त्याने १४८ सामन्यांच्या १४१ डावांमध्ये ६१०२ धावा केल्या आहेत. यात १४८ ही त्याची सर्वोच्च खेळी आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने १३ शतके आणि ३९ अर्धशतके झळकावली आहेत. तसेच विल्यमसनने ५७ टी-20 सामन्यांत ९ अर्धशतकांच्या मदतीने १५०५ धावा केल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -