घरक्रीडासंघ व्यवस्थापनाने जणू मला मुद्दाम बाहेर ठेवले!

संघ व्यवस्थापनाने जणू मला मुद्दाम बाहेर ठेवले!

Subscribe

युवराज सिंगचे विधान

संघ व्यवस्थापनाने मला पाठिंबा दिला असता, तर मी २०११ नंतरही विश्वचषकात खेळलो असतो, असे विधान भारताचा माजी फलंदाज युवराज सिंगने केले आहे. युवराज यावर्षी जूनमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. मात्र, एकेकाळी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारताचा प्रमुख फलंदाज असणार्‍या युवराजने २०१७ नंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. भारताने जिंकलेल्या २०११ विश्वचषकात युवराजने अफलातून कामगिरी करत स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळवला होता. परंतु, त्यानंतर २०१५ किंवा २०१९ विश्वचषकात त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही.

मला २०११ नंतर विश्वचषकात खेळता आले नाही याचे दुःख आहे. मला संघ व्यवस्थापन किंवा संघासोबतच्या महत्त्वाच्या लोकांनी जराही पाठिंबा दिला नाही. मला जर पाठिंबा मिळाला असता, तर मी कदाचित आणखी विश्वचषक खेळलो असतो. मात्र, मी जितके क्रिकेट खेळलो, ते स्वतःच्या हिमतीवर खेळलो, असे युवराज एका मुलाखतीत म्हणाला.

- Advertisement -

त्याने पुढे सांगितले, २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफीनंतरच्या ८-९ सामन्यांपैकी २ सामन्यांत सामनावीराचा पुरस्कार मिळवल्यानंतर मला संघातून वगळण्यात येईल, असे वाटले नव्हते. मला दुखापत झाली आणि त्यानंतर मला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी तयारी कर, असे सांगितले गेले. त्यानंतर अचानक मला वयाच्या ३६ व्या वर्षी यो-यो टेस्टची (फिटनेस चाचणी) तयारी करण्यास सांगण्यात आले. मी यो-यो टेस्टमध्ये पास झालो, तर त्यानंतर मला स्थानिक क्रिकेटमध्ये खेळ, असे सांगितले गेले. त्यांना वाटले होते की, मी वयामुळे यो-यो टेस्ट पास होणार नाही आणि मला संघाबाहेर ठेवणे सोपे जाईल. १५-१६ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या खेळाडूसोबत अशाप्रकारची वागणूक योग्य नाही. त्यांनी मला समोरासमोर बसून स्पष्टपणे सांगितले पाहिजे होते. त्यांनी मला, विरेंद्र सेहवाग किंवा झहीर खान, यापैकी कोणालाही काही सांगितले नाही.

रोहितला कर्णधार बनवता येईल!

कर्णधार विराट कोहलीवरचा ताण कमी करण्यासाठी रोहित शर्माची मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारताचा कर्णधार म्हणून निवड करता येईल, असे मत युवराज सिंगने व्यक्त केले. आधी क्रिकेटचे एकदिवसीय आणि कसोटी असे दोनच प्रकार होते. मात्र, आता टी-२० क्रिकेटची त्यात भर पडल्याने तिन्ही प्रकारांत संघाचे नेतृत्व करणे अवघड आहे. विराटवर जास्त ताण येत असेल तर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये रोहितला कर्णधार बनवता येईल. त्याने कर्णधार म्हणून बरेच यश मिळवले आहे. विराट हा सर्वोत्तम फलंदाज आहे. त्यामुळे त्याच्यावरील ताण कसा कमी करता येईल याकडे संघ व्यवस्थापनाने लक्ष दिले पाहिजे, असे युवराज म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -