घरठाणेकल्याणमध्ये उधळलेल्या म्हशीच्या हल्ल्यात चार जण जखमी

कल्याणमध्ये उधळलेल्या म्हशीच्या हल्ल्यात चार जण जखमी

Subscribe

चार तास थरार

कल्याण । कल्याणमधील चिकणघर भागात सोमवारी संध्याकाळी मोकाट असलेली एक म्हैस अचानक उधळली आणि रस्त्यावर सैरावैरा धावत सुटली. या म्हशीला घाबरुन पादचारी पळू लागले. यावेळी बिथरलेल्या म्हशीने चार ते पाच पादचाऱ्यांना ढुशा मारुन जखमी केले.

चिकणघर परिसरात एक मोकाट म्हैस अचानक उधळून सैरावैरा धावू लागली. म्हैस हंबरडा फोडत धावत असल्याने रस्त्याने जात असलेले पादचारी आडोशाला पळू लागले. या धावपळीत म्हशीने पाच जणांना ढुशी मारल्या. काही वाहनांना तिने धडका दिल्या. म्हैस सहज आटोक्यात येणे शक्य नसल्याने जागरुक नागरिकांनी अग्निशमन दलाला संपर्क केला. काही मिनिटात दलाचे प्रमुख विनायक लोखंडे, जवान हेमंत आसकर, युवराज राठोड, सचिन पवार, मच्छिंद्र बोकरे, सुप्रजा शेट्टी हे चिकणघर परिसरात दाखल झाले. त्यांनी उधळलेली म्हैस सहजगत्या पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु म्हैस साध्या प्रयत्नाने ताब्यात येणे शक्य नव्हते. म्हशीला एका जागी कोंडून मग ती पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला.

- Advertisement -

जागोजागी वाहने, सापळे लावून म्हशीला पकडण्यासाठी जवानांनी मोकाट म्हशीचा पाठलाग सुरू केला. चार तास हा थरार सुरू होता. अखेर मिलिंदनगरमधील एका चाळीच्या बोळात म्हशीला जेरबंद करण्यात जवानांना यश आले. पशुवैद्यकीय अधिकारी घटनास्थळी हजर होते. म्हशीला जेरबंद करताच तिला भुलीचे इंजेक्शन देऊन मिलिंदनगर येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कोंडवड्यात तिची रवानगी करण्यात आली. म्हशीला जेरबंद केल्यानंतर मुले घराबाहेर खेळण्यास बाहेर पडली. गेल्या आठवड्यात डोंबिवलीमध्ये बिथरलेल्या बैलाने मारलेल्या ढुशी मध्ये एक पादचारी मृत्यू पावला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -