घरठाणेविजेची थकबाकी सवलतीत भरण्याची शेवटची संधी

विजेची थकबाकी सवलतीत भरण्याची शेवटची संधी

Subscribe

थकबाकी भरण्यासाठी शासनाने दिलेल्या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन शहरातील टोरेंट कंपनीने केले आहे.

भिवंडी । सरकारच्या विलासराव देशमुख अभययोजना अंतर्गत कायमस्वरूपी खंडित (पीडी) वीज मीटरची जुनी वीजबिल थकबाकी सवलतीत भरण्याची मुदत 31 डिसेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे ही थकबाकी भरण्यासाठी शासनाने दिलेल्या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन शहरातील टोरेंट कंपनीने केले आहे.

भिवंडी शहर व परिसरास वीजपुरवठा आणि वीजबिल वसुलीसाठी शासनाने टोरेंट पॉवर कंपनी यांना फ्रेंचायसी दिलेली आहे. राज्यशासनाच्या महावितरण कंपनीने शहरातील कायमस्वरूपी खंडित (पीडी) मीटरची जुनी महावितरणची थकबाकी असलेल्या ग्राहकांसाठी विलासराव देशमुख अभय योजना नावाची सुवर्ण योजना मार्च-22 मध्ये जाहीर केली होती. या योजनेंतर्गत पीडी थकबाकी असलेल्या वीज ग्राहकांना 100 टक्के व्याज माफी देण्याचे जाहीर केले होते.

- Advertisement -

ही योजना मार्च-22 ते ऑगस्ट-22 या कालावधीसाठी देण्यात आली होती. तथापि, अनेक ग्राहकांच्या मागणीनुसार योजनेची मुदत 31 डिसेंबर 2022 पर्यंत वाढविली होती. या योजनेचा टोरंट पॉवरच्या व्यवस्थापनाने जनता दरबार, वर्तमानपत्रातील लेख, पॅम्प्लेटचे वितरण, ग्राहकांना एसएमएस आदी माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रचार केला आहे. मात्र या साठी फार कमी वीज ग्राहकांनी प्रतिसाद दिला. शिळ-मुंब्रा कळवा परिसरात, सुमारे 1,10,000 ग्राहकांकडे एकूण रु. 350 कोटी पेक्षा जास्त पीडी थकबाकी आहे. या योजनेंतर्गत जुनी थकबाकी 7 कोटी रुपये थकबाकी असलेल्या सुमारे 1650 ग्राहकांनी लाभ घेऊन घेतला आहे.

त्याचप्रमाणे भिवंडीत सुमारे 83,000 ग्राहकांकडे एकूण रु.1100 कोटी पेक्षा जास्त पीडी थकबाकी असूनही त्यापैकी 25 कोटी रुपये भरून आतापर्यंत फक्त सुमारे 1100 ग्राहकांनी या योजनेचा फायदा घेतला आहे. ही योजना 31 डिसेंबर-22 रोजी संपत असून टोरंट पॉवरने, ग्राहकांनी पुढे येऊन या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच कंपनीने कळविल्यानुसार मूळ रकमेवर 10 % सवलतीसह संपूर्ण व्याज माफी देणारी अशी योजना पुन्हा कधीही येणार नाही. दरम्यान टोरंट पॉवरने ग्राहकांना ताकीदही दिली आहे या योजनेची मुदत पूर्ण झाल्यानंतर, जमा झालेली जुनी महावितरण थकबाकी व मीटर न घेण्याचे कारण सांगून वीजचोरी करणार्‍या ग्राहकांवर टोरंट पॉवर नियमांनुसार कठोर कारवाई करेल,असे कळविले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -