घरठाणेमे महिना अखेरीस १५४ गावपाड्यांना २४ टँकरने पाणी पुरवठा

मे महिना अखेरीस १५४ गावपाड्यांना २४ टँकरने पाणी पुरवठा

Subscribe

पाणी टंचाईग्रस्त गावांच्या संभाव्य पाणी टंचाईच्या कृती आराखडा व उपाययोजना अहवालानुसार यंदा ३३४ गावे व ६५२ पाडे संभाव्य पाणी टंचाई ग्रस्त असून यासाठी किमान २२ कोटी खर्च अपेक्षित आहे.

मुंबई महानगरासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या शहापूर तालुक्याला पाणीटंचाईने ग्रासले आहे. तालुक्यातील तब्बल १५४ गावपाड्यांवर पाणीटंचाईचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले असून या गावपाड्यांना २४ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू असून काही गावपाडे वगळता बहुतांशी गावपाड्यांवर दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. यामुळे महिला भगिनींना पाण्याच्या टँकरची चातकासारखी वाट बघावी लागत आहे.भातसा, तानसा व वैतरणा या शहापूर तालुक्यातील मोठ्या जलाशयातून मुंबई महानगरासाठी पाणी पुरवठा करण्यात येत असतानाही शहापूर तालुका मात्र तहानलेलाच आहे. पाणीटंचाई ने ग्रासलेल्या शहापूर तालुक्यासाठी प्रस्तावित असलेली भावली पाणी योजना होईपर्यंत तालुक्यातील महिला भगिनींना पाण्यासाठी वणवण भटकावे लागणार आहे.तालुक्यातील पाणी टंचाईग्रस्त गावांच्या संभाव्य पाणी टंचाईच्या कृती आराखडा व उपाययोजना अहवालानुसार यंदा ३३४ गावे व ६५२ पाडे संभाव्य पाणी टंचाई ग्रस्त असून यासाठी किमान २२ कोटी खर्च अपेक्षित आहे.

पाणी टंचाई कृती आराखड्यात दरवर्षी गाव पाड्यासह टँकरची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. यंदा फेब्रुवारी महिन्यात पाणी टंचाई सुरू झाली असून चार पाड्यासाठी एक टँकर मंजूर झाला होता. तर मे अखेर हा आकडा चार वरून १५४ वर पोहचला आहे. मे महिन्याच्या अखेरीस तालुक्यातील कसारा, वाशाळा, दांड, शिरोळ, अजनुप, खर्डी आदी परिसरातील तब्बल ३६ गावे व ११८ पाडे अशा एकूण १५४ गावपाड्यांवर २४ टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे.
यंदाच्या संभाव्य पाणी टंचाई कृती आराखड्यानुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे तसेच बुडक्या विहिरी घेणे, विहिरीची खोली करणे व गाळ काढणे, विहिर अधिग्रहण करणे, नळ पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती, पूरक नळ पाणी पुरवठा योजना करणे, विंधन विहीरी घेणे व दुरुस्ती करणे ह्या कामांचा समावेश असल्याचे पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. दरवर्षी पाणीटंचाई उपाययोजना करण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्चाचा आराखडा प्रस्तावित करण्यात येत असला तरी पाणी योजनांबाबतीत ठोस नियोजनाचा अभाव असल्याने पाणी टंचाई कृती आराखड्यात दिवसेंदिवस गाव पाड्यासह टँकरची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे.

- Advertisement -

 

 

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -