घरठाणेडोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील फेरिवाल्यांच्या अतिक्रमणावर कारवाई

डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील फेरिवाल्यांच्या अतिक्रमणावर कारवाई

Subscribe

कारवाईमुळे रेल्वे स्थानक भागातील रस्ते मोकळे होते.

डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत रस्ते, पदपथ अडवून बसणार्‍या फेरीवाल्यांवर पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयातील अधिकार्‍याने कारवाई केली. उन्हामध्ये बसून दिवसभर व्यवसाय करता यावा म्हणून फेरीवाल्यांनी या ठिकाणी निवारे उभे केले होते. या निवार्‍यांचा त्रास पादचार्‍यांना होत होता. याविषयी पालिकेत तक्रारी वाढल्याने हे निवारे बुधवारी दुपारी पालिकेच्या फेरीवाला हटाव पथकांनी जमीनदोस्त केले.

फडके रस्ता परिसरातील चिमणी गल्ली, बाजीप्रभू चौक, इंदिरा चौक, डॉ. रॉथ रस्ता, नेहरू रस्ता, पाटकर रस्ता, उर्सेकर, मधुबन सिनेमा गल्ली, रामनगर परिसरातील फेरीवाले पथकाने हटविले. गेल्या आठवड्यात राजेश सावंत यांनी फ आणि ग प्रभागाचा साहाय्यक आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला. पदभार घेतल्यापासून त्यांनी फेरीवाल्यांवर आक्रमकपणे कारवाई सुरू केली आहे.

- Advertisement -

डोंबिवली पूर्वेत दररोज रेल्वे स्थानक भागात 500 ते 600 फेरीवाले व्यवसाय करतात. या फेरीवाल्यांना फेरीवाला हटाव पथकातील काही कामगारांचे पाठबळ आहे. या फेरीवाल्यांना सामान आणण्यासाठी व्याजाने पैसे देण्याचे काम हे कामगार करतात, अशा तक्रारी आहेत. फ, ग प्रभागाचा भौगोलिक पसारा मोठा असल्याने फेरीवाले, बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यासाठी ग प्रभागासाठी स्वतंत्र साहाय्यक आयुक्त सामान्य प्रशासनाने नेमण्याची मागणी जागरूक रहिवाशांकडून केली जात आहे.

सहाय्यक आयुक्त सावंत यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी दुपारी फेरीवाल्यांचे निवारे जेसीबीच्या साहाय्याने तोडण्यास सुरूवात केली. अचानक कारवाई सुरू झाल्याने फेरीवाल्यांनी रेल्वेची स्वच्छतागृह, तिकीट खिडकी, इमारतींच्या आडोशाला आपले सामान बसवले. नवीन साहाय्यक आयुक्त आला की नऊ दिवस फेरीवाल्यांवर कारवाईचा देखावा केला जातो. असा प्रकार होऊ न देता दररोज अशाप्रकारे फेरीवाल्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशा प्रतिक्रीया पादचार्‍यांकडून देण्यात येत होत्या. फेरीवाल्यांवरील कारवाईमुळे रेल्वे स्थानक भागातील रस्ते मोकळे होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -