घरठाणेमाझा राम मला जनसेवेत आणि कामात दिसतो-जितेंद्र आव्हाड

माझा राम मला जनसेवेत आणि कामात दिसतो-जितेंद्र आव्हाड

Subscribe

ठाणे । राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत सोमवारी पाचपाखाडी येथील तुळजाभवानी मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी मला माझा राम चराचरात, जनसेवेत आणि माझ्या कामात दिसतो, असे प्रतिपादन केले तसेच राष्ट्रवादीने शहरातील विविध मंदिरांमध्ये सुमारे दीड ते दोन लाख लाडूंचे वाटप केले. अयोध्येत श्री रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जात असल्याने ठाण्यातही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील अनेक मंदिरात लाडू वाटप करण्यात आले. तसेच, मूर्ती प्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला कळवा पूर्वेत होम हवन, गणेश पूजन, राम अवतार काशी येथील पाच ब्राह्मणांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. या वेळी माजी नगरसेविका वर्षा मोरे, ठाणे शहर सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेसचे अरविंद मोरे यांच्या हस्ते होम हवन करण्यात आले. तसेच काही परिसरात रामलल्लाची मिरवणूकही काढण्यात आली होती.

ठाण्यातील पाचपाखाडी येथील तुळजाभवानी मंदिरात आरती करण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष सुहास देसाई, महिलाध्यक्ष सुजाताताई घाग, महिला कार्याध्यक्ष सुरेखाताई पाटील, तसेच राम भक्त उपस्थित होते.
आज प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा होत आहे, याबद्दल तमाम भारतीयांच्या मनात आनंद दाटून आला आहे. हा राम कुण्या एकाचा नाही तर हा राम भारत भूमीवर जन्माला आलेल्या प्रत्येकाचा आहे. त्यामुळेच आमच्या रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असल्यानेच आज आम्ही महाआरतीचे आयोजन केले होते. तसेच कळव्यात सुमारे 50 हजार झेंडे आणि एक लाख लाडूंचेही वाटप विविध मंदिरांमध्ये केले असल्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले.

- Advertisement -

महर्षी वाल्मिकींमुळेच रामाची ओळख झाली
एकीकडे अनेक नेते मंडळी मोठमोठ्या मंदिरात जात असताना आपण वाल्मिकी मंदिरात वंदन करण्यासाठी आलात, असे विचारले असता डॉ.जितेंद्र आव्हाड म्हणाले की, जेव्हा आपण रामाला वंदन करतो तेव्हा आपण महर्षी वाल्मिकी ॠषींना विसरूच शकत नाही. कारण, प्रभू रामाची ओळखच आपणाला महर्षी वाल्मिकी यांनी करून दिली आहे. सर्व समाज बांधवांना एक करणारे, आदिवासी शबरीची उष्टी बोरे खाणारे, रावणाचा वध करून विभीषणाला सिंहासन देणारे, बालीचा वध करून सुग्रीवाला गादीवर बसवणारे प्रभू रामचंद्र आहेत. सर्वांना एकसंघ करणारे रामराज्य यावे, अशी आमची इच्छा आहे. तसे रामराज्य आणण्यासाठी सर्व समाजघटकांना एक करीत आहोत. प्रभू राम हे कोण्या एकाचे नाहीत ते सर्वांचे आहेत, असे आमदार आव्हाड म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -