बुस्टर डोस घेऊनही केडीएमसी आयुक्त कोरोना बाधित

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सरकारने बुस्टर डोस देण्यास सुरवात केली आहे. हा बुस्टर डोस घेऊन देखील केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी हे कोरोना बाधित झाले आहेत. मनपा आयुक्त कोरोना पाॅझिटिव्ह आल्याने मनपाच्या आयुक्त दालनात करोनाने शिरकाव केला असल्याचे दिसत आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कल्याण डोंबिवली मनपा आयुक्त करोना पाॅझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर गृहविलगीकरणात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती आता ठीक असल्याचे समजते. आयुक्त कोरोना बाधित झाल्यानंतर बुधवारी महापालिका मुख्यालयात सुरक्षेची विशेष काळजी घेतली जात असल्याचे दिसून आले. नेहमीप्रमाणे नागरिकांना मुख्यालयात प्रवेश न देता सुरक्षा रक्षकांकडून मुख्य गेटवरच थांबवून माहिती घेतली जात आहे.

नागरिकांनी काळजी घ्यावी
तर याबाबत पालिका आयुक्तांशी संपर्क साधला असता, आपला कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून गृहविलगीकरणात उपचार सुरु आहेत. नागरिकांनी देखील आपली काळजी घेण्याचे आवाहन आयुक्तांनी केले आहे. नागरिकांंनी कोरोना प्रतिबंधाविषयी नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहनही आयुक्तांनी केले आहे.