घरठाणेठाणे जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेसाठी एक लाख २२ हजार २६९ विद्यार्थी

ठाणे जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेसाठी एक लाख २२ हजार २६९ विद्यार्थी

Subscribe

एक हजार १७९ परीक्षा केंद्र

ठाणे जिल्ह्यात एक लाख २२ हजार २६९ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले असून यासाठी एक हजार १७९ परीक्षा केंद्र असणार आहेत. तब्बल दोन वर्षांनंतर प्रत्यक्ष आजपासून दहावीची परीक्षा सुरू होत आहे. सर्वाधिक जास्त केंद्र हे कल्याणमध्ये असणार असून दहावीच्या परीक्षा ह्या कॉपी मुक्त व्हाव्यात, याच्यावर विशेष भर देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शाळांमधील वर्ग खोलीतील बाकडे ही सॅनिटायझर तसेच इतर सामग्रीचा वापर करून स्वच्छ करण्यात आली. तसेच कोरोना महामारीकाळातील नियमावलीनुसार शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर तसेच वर्ग खोलीच्या बाहेर सॅनिटायजर, थर्मल चेकिंग मशीन, इत्यादी व्यवस्था केली आहे. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाकरिता जिल्ह्यात यंदा दहावी बोर्डाच्या परीक्षांसाठी ३३९ मुख्य केंद्र तर ८४० उपकेंद्र अशी एकूण १,१७९ परीक्षा केंद्र असणार आहेत. यापैकी ठाण्यात ७५, नवीमुंबईत ४०, कल्याण ९०, उल्हासनगर २१, अंबरनाथ २३, मुरबाड १०, शहापूर ०९, भिवंडी ५० आणि भाईंदर येथे २१ मुख्य परीक्षा केंद्र असणार आहेत. कोरोनामुळे दीर्घ कालावधीनंतर होणाऱ्या दहावी बोर्डाच्या परीक्षा ह्या कॉपी मुक्त व्हाव्यात या करता ठाणे जिल्हा शिक्षण विभागाकडून जिल्ह्यात ५ भरारी पथक नेमण्यात आली असून प्रत्येक पथकात ३ ते ५ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे.

- Advertisement -

मास्कचा वापर बंधनकारक
कोरोना महामारीचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर परीक्षा देणे सोयीचे जावे याकरता प्रत्येक शाळांमध्येच परीक्षा केंद्र असणार आहे. शासनाच्या नियमावली नुसार एका बाकावर एक अशी बैठक व्यवस्था असणार आहे. मास्कचा वापर बंधनकारक असणार आहे.

वेळ वाढवून दिला
लेखनाची सवय मोडल्यामुळे विद्यार्थ्यांना ८० मार्कांच्या पेपर साठी ३० मिनिटांची वेळ तर ४० मार्कांच्या पेपरसाठी १५ मिनिटांची वेळ वाढवून देण्यात येणार आहे. तेव्हा दहावी बोर्डाच्या परीक्षा सकाळी १०.३० ते दुपारी २ यावेळेत पार पडणार आहेत. यंदा कोरोना नंतर पहिल्यांदाच बोर्डाच्या प्रत्यक्ष परीक्षा शाळेत पार पडणार असल्याने बैठक व्यवस्थेसाठी ठाण्यातील अनेक शाळांनी परीक्षार्थी विद्यार्थांना सकाळी ९.३० ते १० या वेळत परीक्षा केंद्रावर हजर राहण्यास सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -