आदिवासींचा होडीतून जीवघेणा प्रवास

नदीला जास्त पाणी असेल तर, दोन दोन दिवस वाडीचा संपर्क तुटतो

मुरबाड पासून अवघ्या दहा कि.मी.अंतरावर असणार्‍या तालुक्यातील काळु नदीच्या पलिकडे असलेली चिखलेवाडी पावसाळा आला की त्यांना मरणयातना सोसाव्या लागतात. 2009 साली आलेल्या महापुरात वाडीत जाण्यासाठी असलेला पूल वाहून गेल्यापासून येथील आदिवासी बांधवांचा प्रवास होडीने सुरु होतो.

नदीला जास्त पाणी असेल तर, दोन दोन दिवस वाडीचा संपर्क तुटतो. तालुक्याला चार पाच दिवस मुसळधार पावसाने झोडपले असताना, चिखले वाडीचा संपर्क तुटलेल्या होता. याची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष गोटीराम पवार आणि तहसीलदार संदीप आवारी यांनी होडीच्या साहाय्याने ग्रामस्थांची भेट घेऊन विचारपूस केली. तसेच त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे कीट वाटप केले. आपत्तीच्या काळात ग्रामस्थांच्या पाठीशी असल्याचे आश्वासन दिले.

मुरबाडपासून दहा किमी अंतरावर असलेल्या चिखलेवाडी गावात पोहचण्यासाठी पूल होता. मात्र निकृष्ट कामामुळे 2009 मध्ये हा पूल वाहून गेला. तेव्हा पासून पावसाळा सुरु झाला की चार चार दिवस या वाडीचा संपर्क तुटला जातो. सरकारने या ठिकाणी फायबरची होडी उपलब्ध करुन दिली असून नदीला कमी पाणी असेल तर ग्रामस्थ तिचा उपयोग करतात. तरी देखील जीव मुठीत घेऊन हा प्रवास करावा लागतो. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, आजारी रुग्णाला दवाखान्यात नेण्यास अडचण येत असते.