घरठाणेतुळई प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्ण वार्‍यावर

तुळई प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्ण वार्‍यावर

Subscribe

डॉक्टर अभावी निवृत्त शिक्षकाचा मृत्यू, आरोग्य केंद्रास टाळे ठोकण्याचा इशारा

मुरबाड । तालुका आरोग्य विभागाची यंत्रणा कुचकामी ठरत आहे. तालुक्यातील आदिवासी, वाड्यापाड्यातील अनेक गावातील रुग्ण डोंगराळ भागातील तुळई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येतात. मात्र या केंद्रात अनेक दिवसांपासून रात्री-अपरात्री डॉक्टर कर्मचारी उपस्थित नसतात. डॉक्टर नसल्यामुळे वेळेवर उपचार मिळत नाहीत. उपचार वेळेत न मिळाल्याने सोमवारी येथील निवृत्त शिक्षकाचा मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे रूग्ण कल्याण समितीच्या अध्यक्षांनी रुग्णालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे.

तालुक्यातील तुळई प्राथमिक आरोग्य केंद्रात एकूण 15 अधिकारी, कर्मचारी आहेत. प्रत्यक्षात कामावर नेहमीच कमी कर्मचारी हजर असतात. त्यामुळे कर्मचार्‍यांची वाट पाहात रुग्णांना ताटकळत रहावे लागते. सोमवारी येथील वसंत संभाजी जाधव यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला. त्यांना तातडीने या आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र तेथे वैद्यकिय अधिकारी उपस्थित नसल्याने उपस्थित नर्सने त्यांच्यावर जुजबी उपचार करून त्यांना घरी पाठवले. मात्र पुन्हा त्यांना त्रास झाल्याने त्यांना मुरबाडला खासगी दवाखान्यात हलवले. मात्र वाटेत त्यांचे निधन झाले, डॉक्टर जर उपस्थित असते तर त्यांच्यावर योग्य उपचार होऊन त्यांचे प्राण वाचले असते. या गंभीर घटनेबाबत रुग्ण कल्याण समितीचे सदस्य आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपतालुकाप्रमुख बाळा चौधरी यांनी ही बाब शिवसेना ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार रुपेश म्हात्रे यांचे मार्फत जिल्हा आरोग्य अधिकारी, ठाणे यांचेकडे केली. त्यानंतर या विषयी चौकशीसाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेने एक पथक तुळई केंद्रात पाठवण्यात आले. या केंद्रात जर वेळेवर डॉक्टर, कर्मचारी रुग्णांच्या सेवेसाठी नसतील तर केंद्राला टाळे ठोकून आंदोलन करण्याचा इशारा बाळा चौधरी यांनी दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -