घरUncategorizedठाण्यात प्राचीन युद्धकलेचा थरार

ठाण्यात प्राचीन युद्धकलेचा थरार

Subscribe

मशाल युद्ध पाहून ठाणेकरांची छाती फुलली गर्वाने

महाराष्ट्रदिनाची सायंकाळ शिवसेवा मित्र मंडळाच्या स्तुत्य उपक्रमामुळे ठाणेकरांसाठी पर्वणीची ठरली. काठी, भाला, तलवार, दांडपट्टा सारख्या शस्त्रांच्या युद्धप्रकारांचा थरार ठाणेकरांना प्रत्यक्ष पाहता आला. ठाणे पूर्व येथील शिवसेवा मित्र मंडळाच्या ५२व्या वर्धापनदिनानिमित्त येथील संत तुकाराम क्रीडांगणात प्राचीन युद्धकलेची थरारक प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली.

शिवगर्जना प्रतिष्ठानचे प्रणय शेलार यांच्या नेतृत्वाखाली १८ तरुण कलाकारांनी काठी, भाला, तलवार, दांडपट्टा सारख्या शस्त्रांची युद्धातील विविध प्रात्यक्षिके शिवप्रेमी ठाणेकरांसमोर सादर केली. यावेळी लहान मावळे, रणरागिणींनी सादर केलेल्या युद्धप्रकारांनी प्रेक्षकांची वाहवा मिळवली. कलाकारांनी सादर केलेले मशाल युद्ध पाहून छाती गर्वाने फुलल्याच्या प्रतिक्रिया ठाणेकरांमध्ये उमटल्या. यावेळी ठामपा माजी सभागृह नेते कृष्णा कोळी यांच्या हस्ते शस्त्रपूजा करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे अध्यक्ष अजय नाईक यांनी केले. तर आभारप्रदर्शन मंडळाचे कार्यध्यक्ष गिरीश राजे यांनी पार पाडले. या वेळी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश कोटवणी, ज्येष्ठ शिक्षिका मीना आठवले, चित्रकार शैलेश साळवी, ठाणे जिल्हा एथलेटिक्स असोसिएशनचे पदाधिकारी अशोक आहेर, मयेकर आदी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -