घरमुंबईआदित्य ठाकरेंचा भाऊ देखील निवडणूक लढवणार?

आदित्य ठाकरेंचा भाऊ देखील निवडणूक लढवणार?

Subscribe

आदित्य ठाकरे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता त्यांचा भाऊ देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची शक्यता खात्रीलायक सूत्रांनी वर्तवली आहे.

आगामी विधानसभा निवडणूक महाराष्ट्राच्या राजकारणासाठी महत्त्वाची ठरणार आहे. कारण गेल्या ५ दशकांहून अधिक काळाची राजकीय वाटचाल असणाऱ्या ठाकरे कुटुंबातला पहिला ठाकरे या निवडणुकीत आपलं यश आजमावणार आहे. आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर झाल्यानंतर यावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. मात्र, आता आदित्य ठाकरेंसोबतच ठाकरे कुटुंबातला आणखी एक सदस्य आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. आणि हा सदस्य दुसरा-तिसरा कुणी नसून खुद्द आदित्य ठाकरे यांचा भाऊच असल्याची माहिती समोर येत आहे.

वरूण सरदेसाईंची राजकीय कारकिर्द

आदित्य ठाकरेंचे मावस भाऊ वरूण सरदेसाई यांचं नाव कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी अग्रक्रमाने घेतलं जात आहे. वरूण सरदेसाई कल्याण महानगरपालिका निवडणुकांमध्ये देखील जोमानं शिवसेनेच्या प्रचार मोहिमेत वावरताना दिसले होते. त्यासोबतच नुकत्याच आदित्य ठाकरेंनी काढलेल्या जन आशीर्वाद यात्रेच्या नियोजनामध्ये वरून सरदेसाई यांचा मोठा सहभाग होता. त्याशिवाय आदित्य ठाकरे ज्या युवासेनेचे प्रमुख होते, तिथे देखील वरूण सरदेसाई यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. मुंबई सिनेटच्या निवडणुकीत वरूण सरदेसाईंनी व्यूहरचनेमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. या निवडणुकीत युवा सेनेने सर्वच्या सर्व म्हणजेच १० जागा जिंकून विक्रम रचला होता.

- Advertisement -

हेही वाचा – मनसे आदित्य ठाकरेंसाठी वरळीत उमेदवार देणार नाही!

विजय साळवींना एबी फॉर्म नाही

दरम्यान, कल्याण पश्चिममधून शिवसेनेचे विजय साळवी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, पक्षातर्फे अद्याप त्यांना एबी फॉर्म देण्यात आलेला नाही. त्यामुळे वरूण सरदेसाईंना कल्याण पश्चिममधून उमेदवारी देण्याचा शिवसेना नेतृत्व गांभीर्याने विचार करत असल्याची माहिती सूत्रांकडून समजतेय. शिवसेनेने जागावाटपामध्ये कल्याण पश्चिम मतदारसंघ भाजपकडून आग्रहाने मागून घेतला आहे.

एकनाथ शिंदेंना शह?

वरूण सरदेसाईंना कल्याण पश्चिममधून उमेदवारी देऊन शिवसेनेकडून एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे. एकीकडे चौथ्या फळीतला दुसरा तरूण चेहरा देऊन पक्षाकडे तरूण मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. मात्र, त्याहून महत्त्वाचं म्हणजे ठाण्याच्या राजकारणात ठाकरे परिवारातील सदस्याला प्रस्थापित करणं ही एकनाथ शिंदेंच्या वाढत्या प्रस्थाला शह देण्यात फायदेशीर ठरू शकते, असं देखील बोललं जात आहे. त्यामुळे जर वरूण सरदेसाईंना तिकीट मिळालं, तर विजय साळवींसोबतच एकनाथ शिंदेंसाठी देखील हा अप्रत्यक्ष इशाराच ठरावा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -