घरमहाराष्ट्रपुण्यात शिवसेनेची अस्तित्वाची लढाई

पुण्यात शिवसेनेची अस्तित्वाची लढाई

Subscribe

पुणे शहर लोकसभा मतदारसंघांत सध्या भाजपचे वर्चस्व असून शिवसेेनेची इथे अस्तित्वाची लढाई असणार आहे. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांना आव्हान उभे करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. यापूर्वी येथील सहापैकी तीन मतदारसंघ भाजप आणि तीन सेनेच्या वाट्याला मिळायचे. ज्यात कोथरुड , कॅन्टोन्मेंट आणि वडगांवशेरी येथे शिवसेना उर्वरीत कसबा, पर्वती, शिवाजीनगर हे मतदारसंघ भाजपच्या वाट्याला येत. मात्र २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले. त्यावेळी सर्वच्या सर्व सहा जागा भाजपने जिंकल्या होत्या. त्यात शिवसेनेचा आमदार असलेल्या कोथरुड मतदारसंघ भाजपने आपल्या ताब्यात घेतला. वडगांवशेरी ही जागा राष्ट्रवादीकडून आणि पुणे कॅन्टोन्मेंट ही जागा काँग्रेसकडून भाजपने जिंकून घेत शहरात वर्चस्व निर्माण केले. महापालिका निवडणुकीतही या सहा मतदारसंघात भाजपने बाजी मारली आहे. त्यांच्या नगरसेवकांची संख्या या मतदारसंघात जास्त आहे.

नुकतेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या सहाही मतदारसंघातून भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांना चांगले मताधिक्क्य मिळाले आहे. एकेकाळी समान ताकद असणार्‍या शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांचे संख्याबळ आता बदलले आहे. हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच नगरसेवक शिवसेनेचे या सर्व मतदारसंघात आहेत. तर भाजपने पारंपरीक मतदार असलेल्या पर्वती, कसबा, कोथरुड, शिवाजीनगर या मतदारसंघातून भाजपचे जास्त नगरसेवक निवडून आले, तर पारंपरीक मतदार नसतानाही वडगांव शेरीमध्ये भाजपने संख्याबळ वाढविले आहे. त्यामुळे आता पुण्यात भाजप हा शिवसेनेचा मोठा भाऊ झाला आहे. म्हणूनच शिवसेनेला आता इथे अस्तित्वाची लढाई वाटू लागली आहे. महायुतीच्या जागा वाटपात पुण्यातील कोणता मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला येणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही. तर वडगांव शेरी किंवा शिवाजीनगर या दोनपैकी एक मतदारसंघ मिळावा अशी अपेक्षा शिवसैनिक बाळगून आहेत. कोथरुडची जागा ही हक्काची असल्याचे मतही शिवसैनिक व्यक्त करीत आहेत. तर भाजपच्या शहर पदाधिकार्‍यांकडून शहरातील एकही मतदारसंघ शिवसेनेला दिला जाणार नाही, अशी वक्तव्ये केली जात आहेत. शिवसेनेच्या पक्षनेतृत्वाकडूनही पुण्याकडे तेवढ्या गांर्भीयाने लक्ष दिले जात नसल्याची भावना शिवसैनिकांमध्ये आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यातील जागा वाटप अद्याप झाले नाही. भाजपच्या उमेदवारांसमोर आव्हान निर्माण करणारे उमेदवार त्यांना द्यावे लागणार आहे. कसबा मतदार संघ, पुणे कॅन्टोन्मेट या मतदारसंघात विरोधी पक्षाने अधिक प्रयत्न केले तर त्यांच्या बाजूने पारडे फिरू शकते. परंतु, पक्षांतर्गत राजकारण आणि गटबाजीचा फटका बसू शकतो. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आघाडी धर्म पाळत काम केले तर या दोन मतदारसंघांतील चित्र बदलू शकते. युती झाली नाही तर संभाव्य उमेदवार म्हणून शिवसेनेचे काही नगरसेवक तयारी करीत आहे.

भाजपचे सर्व विद्यमान आमदार निवडणुकीसाठी इच्छूक आहेत. शिवाजीनगर मतदारसंघात आमदार विजय काळे यांच्याबरोबरच पक्षातील तीस जणांनी उमेदवारीसाठी पक्षाकडे अर्ज दिला आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाजपमध्ये चढाओढ दिसून येते. माजी खासदार अनिल शिरोळे यांचा मुलगा आणि नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे, नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे आदींचा यात समावेश आहे .या मतदारसंघातून माजी आमदार आणि शिवसेनेचे माजी शहर प्रमुख विनायक निम्हण हे शिवसेनेचे उमेदवार असू शकतील. हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आला नाही तर निम्हण काय करणार? काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश करणार का? याचे उत्तर पुढील काळातच मिळेल. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षातून उमेदवारीसाठी चढाओढ दिसत आहे. माजी महापौर दत्तात्रय गायकवाड, माजी उपमहापौर निलेश निकम आदि प्रयत्न करीत आहेत. कसबा विधानसभा मतदारसंघातून विद्यमान महापौर मुक्ता टिळक यांचा उमेदवारीचा दावा प्रबळ मानला जात आहे.

- Advertisement -

खासदार गिरीश बापट हे या मतदारसंघातून सातत्याने विजय मिळवित आले आहेत.आता ते खासदार झाल्यामुळे कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार कोण याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. टिळक यांच्याप्रमाणेच बापट यांच्या सुनबाई स्वरदा बापट, नगरसेवक हेमंत रासने,गणेश बिडकर,धीरज घाटे आदि नगरसेवक तयारीला लागले आहेत. काँग्रेस आघाडीकडून ही जागा कोणाला मिळेल त्यावर येथे उमेदवार ठरेल. काँग्रेसकडून रोहित टिळक, गोपाळ तिवारी आदींच्या नावाची चर्चा आहे. शिवसेनेकडून नगरसेवक विशाल धनवडे हेदेखील तयारी करीत आहेत. पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात उमेदवार बदलला जाईल, अशी भाजपमध्ये शक्यता व्यक्त केली जात आहे. विद्यमान आमदार आणि माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे हे उमेदवारी मिळविण्यात यशस्वी ठरणार का किंवा पक्ष दुसर्‍या कोणाला संधी देणार याविषयी उत्सुकता आहे. काँग्रेसकडून या मतदारसंघात माजी आमदार आणि शहराध्यक्ष रमेश बागवे यांचा दावा प्रबळ मानला जात आहे. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ भाजपचे विद्यमान आमदार जगदीश मुळीक यांना पुन्हा संधी दिली जाण्याची शक्यता अधिक आहे.

या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुनील टिंगरे आणि माजी आमदार बापू पठारे यांच्या उमेदवारी संदर्भात चर्चा केली जात आहे. या दोन्ही उमेदवारांनी एकमेकांना सहाय्य करण्याची भूमिका घेतल्याने येथील निवडणूक निश्चित रंगणार आहे. शिवसेनेकडून देखील या मतदारसंघात नगरसेवक संजय भोसले हे प्रयत्नशील आहेत. कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार बदलणार का याबाबत उलट सुलट चर्चा सुरूआहे. विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांनी तयारी सुरू केली असली तरी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी देखील उमेदवारीसाठी फिल्डिंग लावली आहे. शिवसेनेकडून माजी आमदार चंद्रकांत मोकाटे आणि महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार हे संभाव्य उमेदवार असू शकतील. या मतदारसंघात काँग्रेस आघाडीकडे सक्षम उमेदवार शोधावा लागणार आहे. पर्वती विधानसभा मतदारसंघ विद्यमान आमदार आणि भाजपचा शहराध्यक्ष माधुरी मिसाळ यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. या मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्याकरता महापालिकेतील सभागृह नेते श्रीनाथ भिमाले हे जोरदार प्रयत्न करीत आहेत. या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्थायी समितीच्या माजी अध्यक्ष अश्विनी कदम आणि माजी सभागृह नेते सुभाष जगताप यांच्यात चुरस आहे.

पुणे शहर लोकसभा मतदारसंघातील आमदार
वडगांव शेरी – जगदीश मुळीक (भाजप)
शिवाजीनगर – विजय काळे (भाजप)
कोथरुड – मेधा कुलकर्णी (भाजप)
पर्वती – माधुरी मिसाळ (भाजप)
पुणे कॅन्टोन्मेंट – दिलीप कांबळे (भाजप)
कसबा – गिरीश बापट (भाजप)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -