घरमुंबईवर्षा निवासस्थानी भाजपची महत्त्वपूर्ण बैठक; सत्तास्थापनेचं सूत्र ठरणार!

वर्षा निवासस्थानी भाजपची महत्त्वपूर्ण बैठक; सत्तास्थापनेचं सूत्र ठरणार!

Subscribe

राज्यातल्या सत्तास्थापनेविषयी वर्षा निवासस्थानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपच्या वरीष्ठ नेत्यांची बैठक होणार आहे.

शिवसेनेकडून सत्तावाटपासंदर्भात वापरल्या जाणाऱ्या दबावतंत्राच्या पार्श्वभूमीवर आता भाजपनं कंबर कसली असून यासंदर्भात ‘वर्षा’ बंगल्यावर आज संध्याकाळी भाजप नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये भाजपचे राज्यातील महत्त्वाचे नेते उपस्थित असणार आहे. दिल्लीमध्ये झालेली अमित शहा-देवेंद्र फडणवीस भेट, शरद पवार-सोनिया गांधी भेट या पार्श्वभूमीवर या बैठकीमध्ये राज्यातल्या सत्तास्थापनेसंदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शपथविधीसंदर्भात या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या दोन दिवसांमध्ये शपथविधी सोहळा करण्याचा निर्णय बैठकीत होऊ शकतो. या बैठकीला चंद्रकांत पाटील,गिरीश महाजन,सुधीर मुनगंटीवार यांच्यासह भाजपचे महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत.

राज्यातलं सरकार, दिल्लीत घडामोडी!

सत्ता आणि मुख्यमंत्रीपदामध्ये समसमान वाटा मिळण्यावर शिवसेना ठाम असल्यामुळे आता भाजपलाच सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेसोबत विरोधक एकवटल्याचं चित्र राज्यात दिसू लागलं आहे. शरद पवारांनी आज दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीत राज्यातल्या सत्तास्थापनेविषयी चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. शरद पवार स्वत: राज्यात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन शिवसेनेला सत्तेत समान वाटा देऊन नवाच फॉर्म्युला अस्तित्वात आणणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यासाठीच थेट शिवसेनेला पाठिंबा न देता सत्तेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा मिळावा म्हणून शरद पवारांनी सोनिया गांधींची भेट घेतल्याचं बोललं जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार? शरद पवार आणि मुख्यमंत्री दिल्लीत!

मुख्यमंत्र्यांचा काहीही बोलण्यास नकार

दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दिल्लीमध्ये पक्षाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीमध्ये राज्यातल्या सत्तास्थापनेविषयी चर्चा झाली असली, तरी या चर्चेविषयी काहीही बोलण्यास फडणवीसांनी नकार दिला होता. त्यामुळे सत्तास्थापनेभोवतीचं गूढ अधिकच वाढलं आहे. त्यामुळेच आज संध्याकाळी वर्षावर होणाऱ्या बैठकीला महत्त्व प्राप्त झालं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -